ग्राहकाचे ११.७९ लाख १८ टक्के व्याजाने परत करा; व्यंकटेशा बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सला आदेश
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 13, 2023 02:18 PM2023-03-13T14:18:37+5:302023-03-13T14:20:24+5:30
बिल्डर्सने सदनिकेचे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन
नागपूर : सदनिका खरेदी करार करणाऱ्या पीडित ग्राहकाकडून घेतलेले ११ लाख ७९ हजार ७२० रुपये १८ टक्के व्याजासह परत करा, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने व्यंकटेशा बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सला दिला आहे. राजगोपाल झाम हे या फर्मचे भागिदार आहेत.
व्याज २३ एप्रिल २०१५ पासून लागू करण्यात आले आहे. याशिवाय ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्रार खर्चापोटी १५ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम बिल्डर्सनेच द्यायची आहे. राजेंद्र लिखार, असे ग्राहकाचे नाव असून ते मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांना आयोगाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी हा दिलासा दिला.
लिखार यांनी व्यंकटेशा बिल्डर्सच्या कळमना येथील व्यंकटेश सिटी-४ प्रकल्पातील एक सदनिका १२ लाख ७० हजार रुपयांत खरेदी करण्यासाठी २३ एप्रिल २०१५ रोजी नोंदणीकृत करार केला. त्यानंतर बिल्डर्सला एकूण ११ लाख ७९ हजार ७२० रुपये अदा केले. बिल्डर्सने सदनिकेचे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्याचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे लिखार यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.