सुमेध वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीचा सण सहा दिवसावर येऊन ठेपला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. शहरात सुमारे १० ते १२ कोटीचे फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यात बहुसंख्य ग्रीन फटाके आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी फटाक्याच्या मागणीत ५० टक्क्याने घट आल्याचे खुद्द ठोक विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दिवाळीच्या काळात राज्यात सर्वत्रच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची विक्री होते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाने नुकतेच कोरोनामुक्त झालेल्यांना त्रास होण्याची भीती, फटाक्याविरुद्ध पर्यावरणप्रेमींची जनजागृती, दरात वाढ व फार कमी किरकोळ दुकानांना मिळालेली मंजुरी आदी कारणांमुळे यावर्षी फटाक्याचा बार ‘फुसका’ निघण्याची शक्यता आहे. एकट्या गांधीबागसारख्या फटाका बाजारात ५०० वर फटाक्याची दुकाने लागायची, ती आता १५० वर आली आहे. कोरोनामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे ठोक फटाके विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
15 कोटीच्यावर व्यवसाय
ठोक विक्रेत्यांनी सांगितले, फटाके निर्मितीसाठी बेरियम नायट्रेट, सोडियम नायट्रेट, पावडर, कॉपरकोटेड वायर, सल्फर, रद्दी पेपर, सुतळी, अशा कच्च्या मालाची आवश्यकता असते. यंदा या सर्व कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे फटाक्यांच्या किमती वाढल्या आहेत. यातच तयार फटाक्यावर २८ टक्के जीएसटी आहे. परिणामी, फटाक्याच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी साधारण फटाक्याचा बाजार साधारण १५ कोटीचा होता. यावर्षी तो आणखी कमी होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात ९० टक्के फटाके शिवाकाशीवरून येतात.
५८२ व्यावसायिकांना ना-हरकत प्रमाणपत्र
यावर्षी शहरातील ९ अग्निशमन केंद्रातून ५८२ व्यावसायिकांना ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. स्थायी दुकाने लावण्यासाठी अग्निशमन विभागाची परवानगी लागते. अग्निशमन विभागाद्वारे १ हजार रुपये शुल्क तसेच पर्यावरण शुल्क म्हणून ३ हजार रुपये आकारण्यात येत आहे. गेल्या वर्षी ७५२ दुकानांना परवानगी देण्यात आली होती. पोलीस विभागाकडून अंतिम मंजुरी व परवाना दिला जातो. १५ दिवसासाठी दुकानांना परवानगी असते.