नागपूरच्या स्क्रॅप व्यावसायिकाला १२.२४ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:42 AM2019-01-22T00:42:29+5:302019-01-22T00:43:50+5:30
बॅटरीचे स्क्रॅप विकत घेणाऱ्या कळमन्यातील एका व्यावसायिकाला बंगळुरूमधील तिघांनी १२.२४ लाखांचा गंडा घातला. नागपुरातील ओळखीच्या कमिशन एजंटने या फसवणुकीत मुख्य भूमिका वठविली. या चौघांविरुद्ध कळमना पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बॅटरीचे स्क्रॅप विकत घेणाऱ्या कळमन्यातील एका व्यावसायिकाला बंगळुरूमधील तिघांनी १२.२४ लाखांचा गंडा घातला. नागपुरातील ओळखीच्या कमिशन एजंटने या फसवणुकीत मुख्य भूमिका वठविली. या चौघांविरुद्ध कळमना पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
कमल प्रल्हादराय अग्रवाल (वय ५६, रा. नंदलोक अपार्टमेंट, नंदनवन) यांचे कळमन्यातील भरतनगरात कमल ट्रेडिंग नावाने जुन्या बॅटरीचे (भंगार) दुकान आहे. आरोपी मनोज नेवतिया (रा. रामनगर) या धंद्यात कमिशन एजंट म्हणून काम करतो. अग्रवाल यांच्या तो ओळखीचा आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये मनोज अग्रवाल यांच्या दुकानात आला. बंगळुरूमधील व्यापाऱ्यांकडे १०० टन बॅटरी स्क्रॅप असल्याची माहिती त्याने दिली. आपल्या संपर्कातील हे व्यापारी असून, त्यांचा व्यवहार चांगला असल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे अग्रवाल सप्टेंबर २०१८ मध्ये मनोजसोबत बॅटरीचा सौदा करण्यासाठी बंगळुरूला गेले. तेथे आरोपी हाजी सैयद, हाफिज सैयद आणि रहमानभाई (तिघेही रा. जुने विमानतळ, इस्लामपूर मशिदीजवळ, बंगळुरू) यांनी अग्रवाल यांना स्क्रॅप बॅटरीचे गोदाम दाखविले. मात्र, सध्या २१ टनच बॅटरीचाच माल असून, नंतर थोडे थोडे करून माल पाठवू, असे ते म्हणाले. अग्रवाल यांनी हा सौदा करण्यास नकार दिला. मात्र, आरोपी मनोज नेवतियाने हट्ट धरल्यामुळे अग्रवाल यांनी आरोपी हाजी सैयद तसेच हाफिज सैयदसोबत सौदा केला. नंतर ते नागपुरात परत आले आणि त्यांनी त्यांचा नोकर शेख फारुक शेख मोहम्मद याला सौदा केलेला माल घेण्याकरिता बंगळुरूला पाठविले. १४,०५० किलोग्राम माल ट्रकमध्ये भरल्यानंतर त्याचे फोटो तसेच इनव्हाईस फारुकने अग्रवाल यांना पाठविले. उर्वरित माल नंतर येणार असल्याचे कळवले. त्यानुसार, अग्रवाल यांनी एचडीएफसी तसेच युनियन बँकेतून आरोपींच्या खात्यात १२ लाख २४,५३० रुपये आरटीजीएसने जमा केले तर, त्याचे कमिशन म्हणून २८ हजार रुपये नेवतियाच्या खात्यात जमा केले. १२ ते २२ सप्टेंबर २०१८ ला हा व्यवहार पार पडला.
नंतर अग्रवाल मालाचा ट्रक कधी येतो म्हणून वाट बघू लागले. बरेच दिवस होऊनही माल पोहचला नसल्याने त्यांनी आरोपींशी संपर्क साधला. आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ चालवली. आता पाच महिने होऊनही आरोपींकडून अग्रवाल यांना माल मिळालाच नाही. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने अग्रवाल यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी हाजी सैयद, हाफिज सैयद आणि रहमानभाई तसेच नेवतियाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.