नागपूर : बिट क्वाईनमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल अशी बतावणी करून सायबर गुन्हेगाराने एका युवकाला १३ लाख १७ हजारांनी गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे.
क्षितीज विकास गुप्ता (वय २३, रा. फ्रेंड्स कॉलनी, काटोल रोड) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. क्षितीजला त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवर आरोपीने बायएन्का ओडेल नावाच्या आयडी धारकाने मॅसेज केला. बिट क्वाईनमध्ये गुंतवणूक केल्यास मायनिंग प्रॉफीट बँक खात्यात ट्रान्सफर करण्याचे आमिष आरोपीने दाखविले. त्यानंतर आरोपीने क्षितीजला एक अॅप पाठविले. त्या अॅपवर क्षितीजने डिटेल्स भरल्यानंतर आरोपीने नफ्याचे आमिष दाखवून क्षितीजला वेगवेगळ्या खात्यात रक्कम भरण्यास सांगितले.
क्षितीजने एकुण १३ लाख १७ हजार रुपये भरल्यानंतर रक्कम परत मागितली असता आरोपीने रक्कम मिळविण्यासाठी पुन्हा पैसे भरावे लागतील, असे सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच क्षितीजने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ४२०, ६६ (ड) आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.