मासे पकडायला टाकलेल्या जाळ्यात अडकले १४ साप; सर्पमित्रांनी दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 08:45 AM2022-07-06T08:45:00+5:302022-07-06T08:45:01+5:30
अंबाझरी तलावात मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात अनेक साप अडकल्याची घटना घडली. सर्पमित्र व ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी शिताफीने जाळे ताेडून १४ सापांना वाचविले.
नागपूर : अंबाझरी तलावात मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात अनेक साप अडकल्याची घटना घडली. हे सर्व साप जाळ्यात पूर्णपणे गुंतले हाेते. सर्पमित्र व ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी शिताफीने जाळे ताेडून १४ सापांना वाचविले. दाेन सापांचा मात्र यादरम्यान मृत्यू झाला.
मंगळवारी सकाळी हा प्रकार समाेर आला. अंबाझरी तलावात मासेमारी केली जाते. मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात आज माेठ्या संख्येने साप अडकले. हे साप तलावाच्या काठावर काढून तसेच ठेवण्यात आले हाेते. याबाबत ट्रान्झिट सेंटरला माहिती देण्यात आली. सेंटरकडून तलावाजवळच्या परिसरात राहणाऱ्या साैरभ सुखदेवे आणि माेनू सिंग यांना सुचना देण्यात आली. त्यांनी राेहित हुमनाबादकर, शिरीष नाखले व शुभम मेश्राम या सहकाऱ्यांना घेऊन अंबाझरी तलाव गाठले. तलावाजवळ असलेल्या जाळ्यात अतिशय गुंतागुंतीत हे साप अडकले हाेते.
रेस्क्यू टीमने अतिशय शिताफीने जाळ्याचा एकएक दाेरा कापला आणि सापांना साेडविण्याचे प्रयत्न चालविले. या प्रयत्नात अडकलेल्या सापांनी अनेकदा चावाही घेतला. मात्र त्याची तमा न बाळगता सापांना वाचविण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले. अखेर त्यांना यश आले. या जाळ्यात तब्बल १६ साप अडकले हाेते. यातील १४ सापांना रेस्क्यू करण्यात यश मिळाले. त्यांना सुखरूप काढून पुन्हा तलावात साेडण्यात आले. दाेन सर्प मात्र मृत्युमुखी पडले. सतर्क नागरिकांच्या सूचनेमुळे आणि ट्रान्झिटच्या सहकाऱ्यांमुळे १४ सापांना जीवदान देऊन निसर्गमुक्त करता आले.