नांद गणात १४,६०८ मतदार करणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:09 AM2021-09-24T04:09:16+5:302021-09-24T04:09:16+5:30
भिवापूर : नांद पंचायत समिती गणाच्या सदस्या नंदा नारनवरे यांचे ओबीसी आरक्षणावरून सदस्यत्व रद्द झालेल्या जागेवर ५ ऑक्टोबर रोजी ...
भिवापूर : नांद पंचायत समिती गणाच्या सदस्या नंदा नारनवरे यांचे ओबीसी आरक्षणावरून सदस्यत्व रद्द झालेल्या जागेवर ५ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत तब्बल १४,६०८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आ. राजू पारवे व माजी आ. सुधीर पारवे यांच्या गृहतालुक्यातील या पोटनिवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
या पोटनिवडणुकीकरिता माधुरी संजय देशमुख (काँग्रेस), शोभा मोरेश्वर चुटे (भाजप), वनिता संतोष घरत (शिवसेना), सुनीता अशोक वाघ (वंचित), या चार उमेदवारांचे अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल आहेत. जेथे अपील नाही तेथे २७ सप्टेंबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तर अपिलाच्या जागेसाठी २९ सप्टेंबर शेवटची तारीख आहे. ५ ऑक्टोबरला मतदान होणार असून, ६ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी ६,९४७ पुरुष मतदार, तर ७,६६१ महिला मतदार असे एकूण १४,६०८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नांद गट व गण हा नंदा नारनवरे यांचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र आरक्षणावरून सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांनी पोटनिवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे नांदचे मैदान मारण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने कंबर कसली आहे. एकंदरीत या परिस्थितीमुळे चार उमेदवारांपैकी अर्ज मागे घेण्याची शक्यता फारच कमी आहे.