स्वस्तात सोन्याचे आमीष; इंजिनियरला १४.७० लाखांनी गंडविले
By दयानंद पाईकराव | Published: March 30, 2024 09:22 PM2024-03-30T21:22:06+5:302024-03-30T21:22:48+5:30
अंबाझरीत गुन्हा दाखल : ओएलएक्सवर ‘कम दाम मे सोना’ची जाहिरात देऊन फसवणूक
नागपूर : ओएलएक्सवर ‘कम दाम मे सोना’ अशी जाहिरात देऊन एका आयटी इंजिनियरची दोन आरोपींनी १४ लाख ७० हजारांनी फसवणूक केली. ही घटना अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १० जून २०२३ ते ७ जुले २०२३ दरम्यान घडली.
उपेंद्र रमाशंकर मिश्रा (३८, रा. हिंगणा) असे फसवणूक झालेल्या आयटी इंजिनिअरचे नाव आहे. ते एका आयटी कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या मोबाईलवर ओएलएक्सवर ‘कम दाम मे सोना’ ही जाहिरात वाचली. कुटुंबात लग्न असल्याने कमी किमतीत सोने मिळत असल्याचे पाहून त्यांनी रजिस्ट्रेशन केले. त्यानंतर आरोपी अंकित पटेल (मुंबई) याने उपेंद्र यांच्याशी संपर्क साधून कमी किमतीत सोने उपलब्ध करून देण्याची बतावणी केली. आरोपी अंकितने आपला साथीदार मोहन सोळंकी (रा. मुंबई) याच्यासोबत संगणमत करून वारंवार उपेंद्र यांना फोन केले. त्यानंतर दोन्ही आरोपी उपेंद्र यांना अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तेलंगखेडी हनुमान मंदिर चौकात भेटले. त्यांनी सोन्याचे सॅम्पल उपेंद्रला दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी उपेंद्र यांच्याकडून १४ लाख रुपये रोख व आॅनलाईन ७० हजार रुपये असे एकुण १४ लाख ७० हजार रुपये घेतले. परंतु सोने देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच उपेंद्र यांनी अंबाझरी ठाण्यात तक्रार दिली. अंबाझरी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४०६, ४१९, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे.