नागपूर : आरटीईअंतर्गत नामांकित शाळेत गरीब व वंचित मुलांसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येते. बुधवारपासून आरटीईच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली. आपल्या मुलाचा नामांकित शाळेत नंबर लागावा, या अपेक्षेतून पहिल्याच दिवशी १४८१ बालकांचे अर्ज जमा झाले. अर्ज करणाऱ्या पालकांमध्ये सर्वाधिक पालक शहरातील आहेत.
यावर्षी ६८० शाळांनी आरटीईत नोंदणी केली असून, जिल्ह्यात आरटीईच्या ५७२९ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. पालकांनी केलेल्या अर्जात शहरातील नामांकित शाळेला प्राथमिकता दिली आहे. नागपुरात दरवर्षी आरटीई प्रवेशासाठी पालकांचा भरपूर प्रतिसाद मिळतो. यावर्षी पहिल्याच दिवशी मिळालेल्या प्रतिसादावरून किमान ४० हजाराच्या जवळपास अर्ज येतील अशी अपेक्षा आहे. २१ मार्चपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे. गेल्यावर्षी आरटीईत प्रवेशासाठी ३० हजारावर अर्ज आले होते. गेल्यावर्षी आरटीईत ८५ टक्के प्रवेश निश्चित करण्यात आले.