वाहतूकदारांच्या संपामुळे १५ कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 10:37 PM2018-07-20T22:37:08+5:302018-07-21T00:55:37+5:30
डिझेलच्या किमती कमी करा आणि जीएसटीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसअंतर्गत ‘नागपूर ट्रकर्स युनिटी’च्या वाहतूकदारांनी शुक्रवारी आंदोलनादरम्यान ‘चक्का जाम’ केला. आंदोलनामुळे नागपुरात जवळपास १५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती असोसिएशनने दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डिझेलच्या किमती कमी करा आणि जीएसटीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसअंतर्गत ‘नागपूर ट्रकर्स युनिटी’च्या वाहतूकदारांनी शुक्रवारी आंदोलनादरम्यान ‘चक्का जाम’ केला. आंदोलनामुळे नागपुरात जवळपास १५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती असोसिएशनने दिली.
पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करावा आणि इंधनाच्या निरंतर होणाऱ्या दरवाढीवर नियंत्रण आणावे, केरोसिनवर अनुदान द्यावे आणि अन्य मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने २० जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे. थर्ड पार्टी विमा कमी करावा, टोल नाक्यावर असामाजिक तत्त्वांचा वावर थांबवावा, नाक्यावरील शुल्क कमी करावे, या असोसिएशनच्या मागण्या आहेत. या मागण्यांवर निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याच्या अटीवर नागपूर ट्रकर्स युनिटी संघटना आंदोलनात सहभागी झाली.
युनिटीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांची यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर युनिटीच्या पदाधिकाऱ्यांनी वडधामना येथील टोल नाक्यावर नारेबाजी केली. वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना आंदोलनाची माहिती देऊन वाहतूक बंद केली. यावेळी नागपूर ट्रकर्स युनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह, सचिव रजिंदरसिंह सैनी, प्रीतमसिंह सैनी, महेंद्र जैन, महेंद्र लुले, अवतार सिंह, महेंद्रबाल सिंह, टोनी जग्गी, गुरुदयालसिंह पड्डा आणि असोसिएशनचे इतर पदाधिकारी आणि वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२५० खासगी बसची चाके थांबली
ट्रॅव्हल्स असोसिएशन आॅफ नागपूरने या संपाला एक दिवस समर्थन देऊन शुक्रवारी कडकडीत बंद पाडला. यामुळे शहरातील सुमारे २५०वर खासगी बसची चाके थांबली होती. याचा फटका शेकडो प्रवाशांना बसला. खासगी बसच्या संपामुळे प्रवाशांनी एसटी स्थानकांवर गर्दी केली होती. सर्वच बसेस क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन धावत होत्या. अवैध प्रवासी वाहतूकही आज जोरात सुरू होती.
स्कूल बस असोसिएशन संपापासून दूर
आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या संपात स्कूल बस असोसिएशनने पाठिंबा दर्शविला असला तरी नागपूरचा ‘शालेय विद्यार्थी बस वाहतूकदार कल्याणकारी संघ’ संपापासून दूर होता. संघाचे अध्यक्ष राजेंद्र सिंग म्हणाले, राज्याच्या स्कूल बस असोसिएशनने आम्हाला न विचारता हा निर्णय घेतला, शिवाय आमच्या मागण्यांचाही यात समावेश नव्हता. यामुळे असोसिएशन संपात सहभागी झाली नाही.
खासगी बसचे एक दिवसीय समर्थन
आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या संपाला आम्ही शुक्रवारी एक दिवसीय समर्थन दिले होते. यात आमची स्वतंत्र मागणी नव्हती, परंतु त्यांच्या मागणीला आम्ही समर्थन दिले आहे. एक दिवसाच्या संपामुळे २००-२५० बसची चाके थांबल्याने शेकडो प्रवाशांना फटका बसला.
महेंद्र जैन
अध्यक्ष ट्रॅव्हल्स असोसिएशन आॅफ नागपूर
मालवाहतूकदारांची अवस्था शेतकऱ्यांसारखी
मालवाहतूक व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. डिझेलचे वाढते भाव आणि टोलचा भुर्दंड आता सहन करण्यापलीकडे गेला आहे. मालवाहतूकदारांची अवस्था विदर्भातील शेतकऱ्यांसारखी झाली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही.
कुक्कू मारवाह
अध्यक्ष, नागपूर ट्रकर्स युनिटी