गणवेश आणि स्टेशनरीच्या किमतीमध्ये १५ टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:04 PM2019-06-10T12:04:05+5:302019-06-10T12:05:21+5:30
राज्य आणि केंद्रीय बोर्डाच्या शाळांचे वर्ग २४ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे पालकांची पोशाख, स्टेशनरी वस्तू, शालेय बॅग आणि अन्य वस्तू खरेदीसाठी लगबग वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य आणि केंद्रीय बोर्डाच्या शाळांचे वर्ग २४ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे पालकांची पोशाख, स्टेशनरी वस्तू, शालेय बॅग आणि अन्य वस्तू खरेदीसाठी लगबग वाढली आहे. नागपुरातील बहुतांश शाळांचे गणवेश ठराविक दुकानातून जास्त भावातच खरेदी करावे लागतात. गेल्यावर्षी जीएसटीच्या आकारणीमुळे भाव वाढले होते. यावर्षी कापड आणि कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे गणवेश, स्टेशनरी वस्तू आणि शालेय बॅगच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. शाळेच्या फीवाढीसह अन्य वस्तूंच्या दरवाढीचा अनावश्यक भार पालकांना सोसावा लागत आहे.
टिफिन, वॉटरबॅग महागल्या
शाहू स्टेशनरीचे वसंत शाहू यांनी सांगितले की, महागाईचा परिणाम स्टेशनरी मार्केटवर पडला आहे. स्टेशनरीमध्ये ब्रॅण्डेड साहित्यांचे दर वाढले आहेत. कार्टुनच्या साहित्याला विद्यार्थ्यांकडून जास्त मागणी आहे. विद्यार्थ्यांना टिफिन आणि वॉटरबॅग दरवर्षी नवीन हवी असते. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार दरवर्षी नवीन स्टॉक बोलवावा लागतो. थ्रीडी चित्रे असलेल्या साहित्याची बाजारात रेलचेल आहे. यंदा शालेय साहित्यामध्ये १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे.
छोट्या-छोट्या गोष्टींसाठी लागतात पैसे
यावर्षी राज्यांसह केंद्रीय शाळांच्या फी शुल्कात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. केंद्रीय शाळांमध्ये तीन महिन्याचे चार हप्ते पाडून फी वसूल करण्यात येते. एकीकडे फी शुल्कात झालेली वाढ आणि दुसरीकडे शालेय साहित्याचे दर वाढल्यामुळे सामान्य पालकांच्या महिन्याच्या बजेटवर ताण आला आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. वस्तूंच्या खरेदीसाठी दुप्पट पैसे खर्च करावे लागत असल्याचे इतवारीत पोशाख खरेदीसाठी आलेले देवेंद्र सदावर्ते यांनी सांगितले. फी शुल्कावर नियंत्रण आणण्याची मागणी आहे.
पालकांना करावी लागते खर्चात कपात
जून महिन्यात पालकांना पाल्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी खर्चामध्ये कपात करावी लागते. वह्या-पुस्तके, पेन्सिलपासून प्रत्येक स्टेशनरी साहित्याचे भाव वाढले आहेत. गेम, कॅलक्युलेटर, कॉम्युटर, टेडिबेअर अशा मुलांच्या आवडत्या आकारातील कम्पॉस बॉक्स उपलब्ध करून देण्यात आल्याचे इतवारीतील स्टेशनरी व्यापारी आहुजा यांनी सांगितले. कम्पॉक्स बॉक्स ५० ते २०० रुपयांपर्यंत आहे. याशिवाय एअरटाईट लंच बॉक्सची मागणी वाढली आहे. वॉटरबॅगही विविध आकारात आणि रंगात व डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. शाळेच्या वेळेत पाणी थंड राहावे म्हणून एक लिटरच्या थर्मास बॉटलला जास्त मागणी आहे. नामांकित कंपन्यांच्या बॉटल ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.