वर्धा, यवतमाळातील जंगलात १६ मोरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:10 AM2021-01-16T04:10:06+5:302021-01-16T04:10:06+5:30
नागपूर : गुरुवारी यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील जंगलामध्ये १६ मोर मृत्युमुखी पडल्याचे आढळले आहे. बर्ड फ्लूच्या या काळामध्ये मोरांचा ...
नागपूर : गुरुवारी यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील जंगलामध्ये १६ मोर मृत्युमुखी पडल्याचे आढळले आहे. बर्ड फ्लूच्या या काळामध्ये मोरांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यालगतच्या जंगलात आठ मोरांचा मृत्यू झाला असून, वर्धा जिल्ह्यातील बोरगाव दातार (ता. हिंगणघाट) येथे आठ मोर मृतावस्थेत आढळले. यातील एक मादी असून, सात नर आहेत. या दोन्ही ठिकाणांवरील मृत मोरांचे नमुने गोळा करण्यात आले असून, ते प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.
गुरुवारी विदर्भात नव्याने १६९ मृत कोंबड्यांची भर पडली आहे. यासंदर्भात नागपूरचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. किशोर कुंभारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथील एका फार्मवर ८५ कोंबड्या मृत आढळल्या, तर अन्य ठिकाणी असलेल्या खासगी फार्मवर २५ कोंबड्या मृत झालेल्या आढळल्या. गडचिरोली जिल्ह्यातील एका पोल्ट्री फार्मवर १५, गोंदियात ३० आणि वर्धा जिल्ह्यात १४ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची नोंद गुरुवारी घेण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात आर्णी येथे मृत आढळलेल्या व अन्य कोंबड्यांमध्ये ‘राणीखेत’ (मर) आजाराची लक्षणे सकृतदर्शनी आढळली आहे. त्यामुळे अशा पक्ष्यांसाठी प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे.
...
आज अहवाल येणार
नागपूर विभागातून आतापर्यंत मृत पक्ष्यांचे २४ नमुने वेगवेगळ्या तारखांना पाठविले आहेत. त्यांचा तपासणी अहवाल अद्याप आलेला नाही. हे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत असून, आज, शुक्रवारी त्यांचा अहवाल येण्याची अपेक्षा प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. किशोर कुंभारे यांनी व्यक्त केली आहे.
...