विजेच्या सापळ्यात १६ वाघ, ८ बिबट आणि ११ अस्वलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 11:38 AM2020-10-05T11:38:25+5:302020-10-05T11:40:03+5:30
wildlife जानेवारी २०१० ते सप्टेंबर २०२० या काळात १६ वाघ, १८ बिबट आणि ११ अस्वलांचा मृत्यू झाला आहे. या सोबतच अन्य वन्यप्राणीही मारले गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील वन क्षेत्रातून जाणाऱ्या ११ केव्हीच्या वीजवाहिन्या वन्यजीवांसाठी काळ ठरत आहेत. शिकारी टोळ्या या वाहिन्यांवर हूक टाकतात आणि शिकार करतात. या सोबतच, अपघात, शेतकऱ्यांनी शेतीसाठी सोडलेला वीजप्रवाह यामुळेही वन्यजीवांना आपले जीव गमवावे लागले आहेत.
जानेवारी २०१० ते सप्टेंबर २०२० या काळात १६ वाघ, १८ बिबट आणि ११ अस्वलांचा मृत्यू झाला आहे. या सोबतच अन्य वन्यप्राणीही मारले गेले. ही आकडेवारी सेंट्रल इंडिया डब्ल्यूपीएसआयचे संचालक नितीन देसाई यांनी वन्यजीव सप्ताहांतर्गत रविवारी झालेल्या वेबिनारमध्ये सादर केली. आपल्या सादरीकरणामध्ये त्यांनी २०१७ मध्ये गठित झालेल्या वन्यजीव शिकार प्रतिबंधक समितीच्या शिफारशींवर चर्चा केली. तसेच, शिकारीवर नियंत्रण राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली.
वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्यूरोचे प्रादेशिक उपसंचालक एम. मरानको यांनी वन्यजीव गुन्हेगारी या विषयावर मार्गदर्शन केले. वन्यजीवांच्या रक्षणात येणाºया अडचणी, गुन्ह्यांचे प्रकार आणि गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने केल्या जाणाºया प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली. सह्याद्री टायगर रिझर्व्हचे उपसंचालक विशाल माळी यांनी सायबर सेल वन्यजीव क्राईम ब्यूरोची भूमिका स्पष्ट केली. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी रविवारच्या सत्राचा समारोप केला. संचालन पेंचचे सहायक वनसंरक्षक अतुल देवकर यांनी केले.