चोरी करून विक्री केलेल्या १६ दुचाकी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:09 AM2021-04-02T04:09:08+5:302021-04-02T04:09:08+5:30

१३ दुचाकी नागपूर शहरातील भिवापूर : उपराजधानीतून दुचाकीची चोरी केल्यानंतर ग्रामीण भागात त्यांची विक्री करणाऱ्या सराईत चोरट्यांचा गोरखधंदा स्थानिक ...

16 two-wheelers stolen and sold | चोरी करून विक्री केलेल्या १६ दुचाकी ताब्यात

चोरी करून विक्री केलेल्या १६ दुचाकी ताब्यात

Next

१३ दुचाकी नागपूर शहरातील

भिवापूर : उपराजधानीतून दुचाकीची चोरी केल्यानंतर ग्रामीण भागात त्यांची विक्री करणाऱ्या सराईत चोरट्यांचा गोरखधंदा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उजेडात आणला आहे. यात १६ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या असून त्यापैकी तब्बल १३ दुचाकी नागपूर शहरातील असल्याची माहिती आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या सर्व दुचाकी सध्या भिवापूर पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आल्या आहे. प्राप्त माहितीनुसार गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना सूत्रांकडून माहिती मिळाली की भिवापूर येथील सचिन शंभरकर व आशिष खडसंग या दोन जणांनी भिवापूर तालुक्यात दुचाकी गाड्यांची विक्री केली असून त्या चोरीच्या असल्याची शक्यता वर्तविली. त्या आधारावर गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित वाहन खरेदी करणाऱ्या वाहनधारकांना भिवापूर पोलीस स्टेशन मध्ये कागदपत्रासह वाहन घेऊन बोलाविले. सदर दुचाकीच्या इंजिन क्रमांकावरून वाहन पोर्टलवर वाहनांची माहिती घेतली असता सदर दुचाकी नागपूर शहरातील वेगवेगळ्या पोलीस‌ स्टेशनमध्ये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे उजेडात आले. ही सर्व १६ दुचाकी वाहने गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली. यापैकी १३ दुचाकी नागपूर शहरातील लकडगंज, धंतोली, पाचपावली, हुडकेश्वर, सिताबर्डी, पारडी, यशोधरानगर, कळमना पोलीस स्टेशनअंतर्गत चोरी गेल्या प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय पुढील कायदेशीर कारवाई करीता संबंधित पोलीस स्टेशनला पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे, सचिन मते, नरेंद्र गौरखेडे, जावेद शेख, रमेश भोयर, संतोष पंदरे, मदन आसतकर, नाना राऊत, शैलेश यादव, राधेश्याम कांबळे, बालाजी साखरे, रोहन डाखोरे, सतीश राठोड, अमोल कुथे यांनी केली.

आरोपी चंद्रपूर कारागृहात

स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई यशस्वी केली असली तरी या‌ कारवाईच्या पूर्वीच चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर पोलिसांनी दुचाकीची चोरी व विक्री प्रकरणात आरोपींना अटक केली आहे. सध्या ते आरोपी चंद्रपूर कारागृहात असल्याचे समजते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दुचाकी प्रकरणात सदर आरोपींचा सहभाग असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे सदर आरोपी कारागृहातून बाहेर पडताच गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या मुसक्या आवळणार हे निश्चित.

‌ स्थानिक चोरट्यांचा सहभाग

गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईत संशयित आरोपी म्हणून शहरातील दोन इसमांची नावे समोर आली आहे. सदर दोन्ही इसमांच्या पार्श्वभूमीची नोंद सध्या स्थितीत भुरटे चोर म्हणून आहे. मात्र वास्तविक पाहता अनेक चोरीच्या घटनांत या चोरट्यांनी सराईत चोर म्हणून भूमिका वठविली आहे. त्यामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे फायनान्स कंपन्यांमधून अन्य दुसऱ्या अनोळखी व्यक्तीच्या नावे महागडे‌ माेबाईलची खरेदी करून ते तिसऱ्या व्यक्तीला विक्री केल्याचे प्रकार या चोरट्यांनी केले आहे.

--

जप्त करण्यात आलेल्या दुचाकींसह कारवाई करणारे गुन्हे शाखेचे पथक व पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर.

Web Title: 16 two-wheelers stolen and sold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.