लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १७३ परकीय प्रजातींच्या वनस्पतींमुळे भारतीय परिसंस्थेचे अस्तित्व आज धाेक्यात आले असल्याची भीती व्यक्त करीत, देशी प्रजातींना परकीय प्रजातींच्या विळख्यातून सोडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सातपुडा फाउंडेशनचे संस्थापक व वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे यांनी केले आहे.
आपल्या परिसंस्थांच्या पुनर्स्थापनेचे नियोजन व अंमलबजावणी या पर्यावरण दिनाच्या संकल्पनेवर त्यांनी मत मांडले. भारतामध्ये शुष्क पानझडी अरण्यांपासून तर दलदलयुक्त जंगले, पाणथळ जलाशय परिसंस्था, खारफुटी प्रदेश, वाळवंटी प्रदेशातील खुरटी वने ते पर्जन्यहारी वनांच्या परिसंस्थांपुढे परकीय प्रजातींनी फार मोठे आव्हान निर्माण केले आहे. देशाचे पर्यावरण सांभाळण्यात या सर्व परिसंस्था मोलाची कामगिरी बजावत असतात, परंतु या परिसंस्थांना आज काही परकीय प्रजातींनी धोका निर्माण केला आहे.
याबाबत भारतात अभ्यास करण्यात आला असून, अशा सुमारे १७३ परकीय प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या या परकीय प्रजातींमध्ये घाणेरी वेडी बाभूळ, पार्थेनियम गवत, तरोटा, अलीगेटर तण, पिकांमध्ये येणारे सिआम तण तर गोड्या पाण्याच्या जल परिसंस्थांमध्ये येणारी जलपर्णी अशा प्रजातींचा समावेश होतो. त्यांचा समूळ नायनाट केल्याशिवाय आपल्या परिसंस्था खुला श्वास घेऊ शकणार नाहीत, पण ते काम तितकेसे सोपे नाही. त्यासाठी शासन तसे समाजाकडून एकाच वेळी एकत्रित लढा देण्याची गरज आहे.
नष्ट करण्याची पद्धती
विदर्भातील डॉ.गजानन मुरतकर यांनी दिल्लीचे वनस्पती शास्त्रज्ञ डॉ.सी.आर. बाबू यांच्या मार्गदर्शनात अशा परकीय वनस्पतींचे उच्चाटन करून स्थानिक गवत प्रजाती वाढविणारी एक विशिष्ट पद्धत विकसित केली आहे. भारतातील सुमारे १२ राज्यांमध्ये त्यांनी वनविभागाच्या माध्यमातून ही पद्धती राबविली आहे. मागील पाच-सहा वर्षांमध्ये या प्रयोगाचे चांगले परिणाम दिसून आले आहे. विदर्भातील लोणार सरोवरातून वेडी बाभूळ उच्चाटनाचे, मेळघाटमधून घाणेरी (लांटेना) समूळ नष्ट करण्याचे तर भंडारा-गोंदिया जिल्ह्यांमधील तलावांमधून बेश्रम उच्चाटन करून स्थानिक प्रजाती लागवडीचे काम हाती घेण्यात आले आहे.