लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या विशेष पथकाने एका सराईत चोरट्यांच्या टोळीचा छडा लावला. आठ गुन्हेगारांच्या या टोळीत एका अल्पवयीन मुलासह तीन महिलांचाही समावेश आहे. गणेशपेठ, शांतिनगर, तहसील, लकडगंज परिसरात गेल्या चार महिन्यात चोऱ्या, घरफोडीच्या घटनांची मालिका सुरू झाली. काही ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीच्या ठिकाणी संशयास्पद महिला आणि अल्पवयीन मुले दिसून येत असल्याने, पोलिसांनी त्यांची माहिती काढणे सुरू केले. या पार्श्वभूमीवर, दोन दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलाला तहसील पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने चोरी, घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर, आपल्या साथीदारांची नावेही सांगितली. त्यानंतर पोलिसांनी अजय ऊर्फ राजू चंद्रकांत खापेकर (वय २३, रा. तीनखंबा, शीतलामाता मंदिरजवळ) आणि प्राची सतीश गौर (वय २३, रा. नवीननगर घरसंसार सोसायटी, पारडी) या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांनी चौकशीत गणेशपेठमधील दोन, शांतिनगर आणि लकडगंजमधील प्रत्येकी एक, तहसीलमधील ११ गुन्ह्यांची कबुली दिली. आपल्या टोळीतील अन्य साथीदारांची नावेही सांगितली. पोलिसांनी या टोळीकडून आतापर्यंत रोख रक्कम, सोन्याचे दागिने, दुचाकी मोबाईलसह १० लाख ८८ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त लोहित मतानी, सहायक आयुक्त परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलचे ठाणेदार जयेश भांडारकर, पीएसआय स्वप्निल वाघ, राठोड, एपीआय बघेल, हवालदार अजयसिंग ठाकूर, लक्ष्मण शेंडे, प्रमोद शनिवारी, शैलेश दाभोले, किशोर गरवारे, पंकज डबरे, नजीर शेख, यशवंत डोंगरे, शिपाई गगन यादव, आशिष अंबादे, फुलचंद बोकाडे, रवींद्र पाटील आणि अश्विनी यांनी ही कामगिरी बजावली.
----
रेल्वेतही चोऱ्या
या टोळीतील सदस्य चोरी करण्यात एवढे सराईत आहेत की, धावत्या रेल्वेतही ते प्रवासाच्या बॅग हातोहात लंपास करून त्यातील माल साफ करतात. अशा दोन गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उजेडात येण्याची शक्यता पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
---