नागपूर : कोरोनाचाी स्थिती नियंत्रणात असलीतरी दैनंदिन रुग्णसंख्येतील चढउतार कायम असल्याने चिंता मात्र कायम आहे. गेल्या २४ तासात नागपूर जिल्ह्यात २० रुग्ण आढळून आले. यात शहरातील १६ तर ग्रामीणमधील २ आहेत. रुग्णांची एकूण संख्या ४,९२,७६२ झाली असून मृतांची संख्या १०,११५वर स्थिरावली आहे. आज बाधितांच्या तुलनेत कमी, १९ रुग्ण बरे झाले. सध्या कोरोनाचे ३११ रुग्ण सक्रिय आहेत.
नागपूर जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्या, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि कोरोनामृत्यू याबाबतची आकडेवारी मागील काही दिवसांपासून एका टप्प्यावर येऊन स्थिरावली आहे. मृत्यूच्या संख्येत अपेक्षित घट झाली असताना रुग्णसंख्या कमी होऊन पुन्हा वर जात असल्याने आरोग्य विभागापुढील डोकेदुखी कायम असल्याचे दिसत आहे. रविवारी ६,२८७ चाचण्या झाल्या. पॉझिटिव्हीटीचा दर ०.३१ टक्क्यांवर आला आहे. आतापर्यंत ४,८२,३३६ रुग्ण बरे झाले असून कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण ९७.८८ टक्क्यांवर आले आहे. सध्या १०१ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. २१० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
-मृत्यूचा दर २ टक्क्यांवर
‘आयसीएमआर’ व ‘कोविड १९’ पार्टलमध्ये नोंद न झालेले १,०७६ मृत्यू व १५,३०६ रुग्णांची नोंद शुक्रवारी करण्यात आली. यामुळे नागपूर जिल्ह्यातील गुरुवारी असलेला १.८९ टक्के मृत्यू दर आता तो २.०५ टक्क्यांवर पोहचला. शहरात आतापर्यंत ५,८९१ तर ग्रामीणमध्ये २,६०३ रुग्णांचे बळी गेले आहेत.
:: कोरोनाची रविवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ६२८७
शहर : १६ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : २ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,९२,७६२
ए. सक्रिय रुग्ण : ३११
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,३३६
ए. मृत्यू : १०,११५