आरटीईच्या प्रवेशासाठी मागितले २० हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 10:07 AM2019-05-10T10:07:36+5:302019-05-10T10:10:07+5:30
आरटीईच्या प्रवेशात आता दलालही सक्रिय झाले आहे. समाधान केंद्राकडे आलेल्या तक्रारीत एका दलालाने पालकाकडून २० हजार रुपये घेतले आहे. विशेष म्हणजे या दलालाने आरटीईचे बोगस प्रवेशपत्र पालकांला उपलब्ध करून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरटीईच्या प्रवेशात आता दलालही सक्रिय झाले आहे. समाधान केंद्राकडे आलेल्या तक्रारीत एका दलालाने पालकाकडून २० हजार रुपये घेतले आहे. विशेष म्हणजे या दलालाने आरटीईचे बोगस प्रवेशपत्र पालकांला उपलब्ध करून दिले.
राईट टू एज्युकेशन अंतर्गत नामांकित शाळेत आर्थिक दुर्बल घटकाच्या मुलांना मोफत शिक्षणाची संधी शासनाने उपलब्ध करून दिली. पण या योजनेतून पैसे लाटण्याचा प्रकार काही दलाल करीत आहे. या तक्रारी एका पालकाला शिंदे नावाच्या दलालाने नामांकित शाळेत प्रवेश करून देतो म्हणून २० हजार रुपये मागितले. पैसे दिल्यानंतर पालकाला नामांकित शाळेचे बोगस प्रवेशपत्रही दिले. पालक जेव्हा शाळेत पोहचले, तेव्हा शाळेने प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे पालकाची फसगत झाल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात पालकाने समाधान केंद्राकडे तक्रार केली.
सधन पालकाने नाकारला प्रवेश
अनुसूचित जमातीच्या पालकाला आरटीई प्रवेशासाठी उत्पन्नाची मर्यादा नाही. त्यामुळे एका सधन पालकाने आरटीईत अर्ज केला. त्या पालकाच्या मुलाचा लॉटरीमध्ये नामांकित शाळेत नंबरही लागला. पण पालक जेव्हा व्हेरीफिकेशन सेंटरवर गेल्यानंतर गरीब पालकांची प्रवेशासाठी होत असलेली तगमग लक्षात घेता, त्या पालकाने स्वत: मुलाचा आरटीईत प्रवेश नाकारला.
३७६५ मुलांचे झाले प्रवेश
आरटीईच्या पहिल्या लॉटरीत जिल्ह्यात ५७०१ बालकांची निवड झाली. पहिल्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेला शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात ३७६५ बालकांचे प्रवेश निश्चित झाले होते. यातील २१४ बालकांचे प्रवेश रद्द झाले असून, १७१५ पालकांनी अजूनही संपर्क साधलेला नाही.