विविध रेल्वेस्थानकांवरून वेगवेगळया दिशांना २०० स्पेशल रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 08:22 PM2020-05-29T20:22:01+5:302020-05-29T20:25:19+5:30
कोरोनामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने १ जूनपासून विविध रेल्वेस्थानकांवरून वेगवेगळया दिशांना २०० स्पेशल, मेल, एक्स्प्रेस गाड्या चालविण्याचे ठरविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने १ जूनपासून विविध रेल्वेस्थानकांवरून वेगवेगळया दिशांना २०० स्पेशल, मेल, एक्स्प्रेस गाड्या चालविण्याचे ठरविले आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत १ जूनपासून ०२८१०/०२८०९ हावडा-मुंबई-हावडा मेल ही गाडी राजनांदगाव, डोंगरगड, गोंदिया, तुमसर रोड व भंडारा रोड येथे थांबेल. ०२८३४/०२८३३ हावडा-अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस ही गाडी राजनांदगाव, डोंगरगड, आमगाव, गोंदिया, तिरोडा, तुमसर रोड, भंडारा रोड व कामठीला थांबणार आहे. तर ०२०७०/०२०६९ गोंदिया-रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी डोंगरगड, राजनांदगाव येथे थांबेल. या गाड्यांमधील प्रवाशांसाठी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर काही सूचना जारी केल्या आहेत. सोबतच या रेल्वेस्थानकावर प्रवाशांनी शारीरिक अंतर ठेवण्याबाबत आणि रेल्वेगाड्यात सुरक्षित प्रवेश करण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहेत. गोंदिया रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या दक्षिण प्रवेशद्वारातून प्रवासी ये-जा करू शकतील. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांनी प्रवाशांना नियमांचे पालन करून आपली आणि इतरांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
प्रवाशांसाठी हे आहेत नियम
फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वेस्थानकात प्रवेश, कुटुंबीयांना प्रवेश नाही
मास्क घालणे गरजेचे
आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केलेले असावे
प्रवाशांना वैद्यकीय चाचणीसाठी ९० मिनिटांपूर्वी रेल्वेस्थानकावर यावे लागेल
भोजन, पाण्याची व्यवस्था प्रवाशांना स्वत: करावी लागेल
प्रवाशांना रेल्वेस्थानक, रेल्वेगाड्यात शारीरिक अंतर ठेवावे लागेल
आपल्या शहरात पोहोचल्यानंतर प्रवाशांना राज्य, केंद्र शासनाच्या नियमांचे पालन करावे लागेल
रेल्वेगाड्यात बेडरोल देण्यात येणार नाही