लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मे महिन्यात २२ कोटी ८७ लाख रुपयांच्या तिकिटांची विक्री केली आहे. याशिवाय मे महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी अभियानाद्वारे १ कोटी ६१ लाख रुपये वसुल करण्यात आले आहेत.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मे महिन्यात ४१.५० लाख तिकिटांची विक्री केली. या विक्रीतून विभागाला २२ कोटी ८७ लाखाचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षाच्या तुलनेत हे उत्पन्न १.७२ टक्के अधिक आहे. पार्सल बुकिंगच्या माध्यमातून विभागाला ५५ लाख रुपये मिळाले. माल वाहतुकीद्वारे १७.३५ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले तर खानपानाच्या माध्यमातून विभागाने ४.२४ लाख रुपये आणि पार्किंगच्या माध्यमातून ६.३३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत विभागाने उत्पन्नात बाजी मारली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. रमणा, वाणिज्य अधिकारी यांच्या नेतृत्वात तिकीट तपासणी कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या सहकार्याने विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. अभियानात विना तिकीट ५१ हजार फुकट्या प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दंडापोटी १ कोटी ६१ लाख रुपये वसूल करण्यात आले. प्रवाशांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी योग्य दराचे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
तिकीट विक्रीतून रेल्वेला मिळाले २२ कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:22 PM
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मे महिन्यात २२ कोटी ८७ लाख रुपयांच्या तिकिटांची विक्री केली आहे. याशिवाय मे महिन्यात राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी अभियानाद्वारे १ कोटी ६१ लाख रुपये वसुल करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देदपूम रेल्वेचे उत्पन्न वाढले : विशेष तिकीट तपासणीद्वारे १.६१ कोटींची कमाई