लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर प्रदेशातील व्यापाऱ्याला देण्यासाठी पाठविलेली २४ लाखाची तूर डाळ ट्रक चालकासह तिघांनी परस्पर लंपास केली.
सौरभ चंद्रकुमार गुप्ता (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची कळमन्यात दाल मिल आहे. यूपीतील एका व्यापाऱ्याने दिलेल्या ऑर्डरनुसार त्यांनी २३ लाख ९० हजार रुपये किमतीची २५ टन तूर डाळ ८ एप्रिलला आरोपी रामरतन (रा. शंकरगड कटरा, यूपी), राहुल तसेच राजकुमार या तिघांच्या ट्रकमध्ये भरली. हा ट्रक उत्तर प्रदेशातील प्रतापगडजवळच्या ग्रामगंज पट्टी येथील बजरंग एजन्सीमध्ये पोहोचवायचा होता. मात्र उपरोक्त तीन आरोपींनी तो ट्रक आणि डाळ नमूद एजन्सीकडे पोहचविलीच नाही. पाच दिवस झाले तरी तूर डाळ पोहोचली नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशातील व्यापाऱ्याने गुप्ता यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली. त्यातून आरोपींनी २४ लाखाच्या तूर डाळीची परस्पर विल्हेवाट लावल्याचे लक्षात आले. त्यावरून गुप्ता यांनी कळमना पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी रामरतन, राहुल आणि राजकुमार या तिघांविरुद्ध विश्वासघाताचा गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.
---