नागपूर मनोरुग्णालयात नऊ महिन्यात २५ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:09 AM2018-10-03T00:09:14+5:302018-10-03T00:10:16+5:30
नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांची प्रकृती बिघडल्यामुळे मृत्यूचे सत्र थांबतच नसल्याची स्थिती आहे. रविवारी ३० सप्टेंबरला रात्री ११ वाजता मनोरुग्णालयाच्या ६० वर्षीय रुग्णाचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या वर्षी ९ महिन्यात २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी ही संख्या २४ होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांची प्रकृती बिघडल्यामुळे मृत्यूचे सत्र थांबतच नसल्याची स्थिती आहे. रविवारी ३० सप्टेंबरला रात्री ११ वाजता मनोरुग्णालयाच्या ६० वर्षीय रुग्णाचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या वर्षी ९ महिन्यात २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील वर्षी ही संख्या २४ होती.
सूत्रानुसार या वर्षी मे महिन्यात २१ दिवसात ६ मनोरुग्णांसह ८ जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे मनोरुग्णालयाने आवश्यक खबरदारी बाळगली होती. परंतु त्यानंतरही जूनमध्ये १ आणि जुलै-आॅगस्ट या दोन महिन्यात ५ मनोरुग्णांचा मृत्यु झाला. आता सप्टेंबर महिन्यात मनोरुग्णांच्या मृत्यूचा आकडा ४ होऊन एकूण २५ जणांचा मृत्यू झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
१५ डॉक्टर, एक एमडी
मिळालेल्या माहितीनुसार, मनोरुग्णालयात १५ डॉक्टर आणि एक एमडी डॉक्टर आहे. मेडिकल हॉस्पिटलमधूनही मनोरुग्णांच्या तपासणीसाठी फिजिशियनला बोलविण्यात येते. एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या असूनही रुग्णांची प्रकृती बिघडण्याचे आणि त्यांच्या मृत्यूचे सत्र थांबत नसल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
अज्ञात मनोरुग्णाचा मृत्यू
मनोरुग्णालयात ६० वर्षीय मनोरुग्णाला २४ आॅगस्टला दाखल करण्यात आले होते. परंतु १० सप्टेंबरला त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्यास मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. मेडिकलमध्ये २० दिवस उपचार घेतल्यानंतर या रुग्णाचा मृत्यू झाला.
कर्मचाऱ्यांची लेटलतिफी
मनोरुग्णांना उपचारासाठी बाह्यरुग्ण विभागात घेऊन जाणा ऱ्या नातेवाईकांनाही त्रास होत आहे. बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ३ आहे. परंतु काही कर्मचारी सोडले तर बहुतांश कर्मचारी ९.३० पूर्वी उपस्थित राहत नसल्याची त्यांची तक्रार आहे. तर दुपारी २ वाजताच निघून जात असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.
माहिती घेतो : डॉ. पातूरकर
प्रादेशिक मनोरुग्णालयाचे नवनियुक्त अधीक्षक डॉ. देवेंद्र पातूरकर यांनी सांगितले की, त्यांना प्रभार घेऊन एक दिवस झाला आहे. असे का होत आहे याची माहिती घेतो असे त्यांनी सांगितले. उपअधीक्षक डॉ. प्रवीण नवघरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.