लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या महिन्यात मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई केल्यानंतर वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचालक (डीजीजीआय) कार्यालयाच्या नागपूर युनिटने नागपुरातील पाच मोठ्या ऑटोमोबाईल डीलर्सकडून व्याजासह कोट्यवधींचा जीएसटी वसूल केला आहे.ही कारवाई हाय एन्ड कार जसे जग्वार, बीएमडब्ल्यू आणि हाय अॅन्ड मोटरसायकल जसे हार्ले डेव्हिडसन आणि कावासाकी कंपनीच्या डीलर्सवर करण्यात आली. या डीलर्सकडून डीजीजीआयच्या अधिकाऱ्यांनी २८.४७ लाख रुपयांच्या व्याजसह २५.०४ कोटी रुपये वस्तू व सेवा कर (जीएसटी) वसूल केला. या डीलर्सने ग्राहकांकडून वस्तू व सेवा कर वसूल केल्यानंतरही विभागाकडे जमा न केल्याच्या माहितीच्या आधारे डीजीजीआयने ही कारवाई केली. डीजीजीआय झोनल युनिटच्या तपासणीदरम्यान संबंधित डीलर्सने कर जमा न केल्याचे कबूल केले. या डीलर्समध्ये आनंद टेक्नो मार्केटिंग (प्रा.) लि.ने (जग्वार डीलर) १५.४४ कोटी रुपये, मानधन मोटर्स प्रा.लि.ने (बीएमडब्ल्यू डीलर) २.३४ कोटी रुपये, स्टार बाईक्सने (कावासाकी डीलर) २७.७४ लाख रुपये, लिजेंड बाईक्स एलएलपीने (हार्ले डेव्हिडसन डीलर) ५.७७ लाख रुपये आणि आनंद माईन टुल्स (प्रा.) लि.ने (जग्वार डीलर) ६.९१ कोटी रुपये वस्तू व सेवा कर भरला आहे.
पाच ऑटोमोबाईल डीलर्सकडून २५.०४ कोटींची जीएसटी वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 10:59 PM
वस्तू व सेवा कर गुप्तचर महासंचालक (डीजीजीआय) कार्यालयाच्या नागपूर युनिटने नागपुरातील पाच मोठ्या ऑटोमोबाईल डीलर्सकडून व्याजासह कोट्यवधींचा जीएसटी वसूल केला आहे.
ठळक मुद्दे २८.४७ लाख व्याज : डीजीजीआयची कारवाई