२५.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:08 AM2021-01-18T04:08:35+5:302021-01-18T04:08:35+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि भिवापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना रॉयल्टी वाहतूक करणारे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि भिवापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना रॉयल्टी वाहतूक करणारे टिप्पर पकडले. यात वाहनचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण २५ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.१६) रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
भाग्यश्री वसंता खोब्रागडे (२६, रा. सौंदड, ता. पवनी) असे अटक करण्यात आलेल्या टिप्परचालकाचे नाव आहे. पवनी-भिवापूर मार्गे रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांना मिळाली. दरम्यान ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलीस निरीक्षक शरद भस्मे व गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक राष्ट्रीय मार्गावरील पेट्रोल पंपसमोर नाकाबंदी सुरू केली. अशात रात्री ११ वाजताच्या सुमारास पवनीकडून भरधाव येणाऱ्या टिप्परवर (क्र.एमएच-३६ एए-८८८२) संशय आल्याने पाेलिसांनी टिप्पर थांबवून तपासणी केली असता, त्यात रेती असल्याचे आणि ती रेती विना राॅयल्टी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चालकास अटक करून त्याच्याकडून पाच ब्रास रेती व टिप्पर असा एकूण २५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी टिप्पर चालक व मालकाविरुद्ध भादंवि कलम ३७९, १०९ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे.