लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराच्या सौंदयीकरणात भर पडावी, रस्ते दुरुस्तीवरील खर्चात बचत व्हावी, या हेतूने शहरात सिमेंट काँक्रिट रोड निर्माण केले जात आहे. परंतु वर्षानुवर्ष काम रखडल्याने वा संथ कामामुळे नागरिक व वाहन चालक त्रस्त झाले आहेत.महापालिकेच्या मंगळवारी झोन क्षेत्रातील गिट्टीखदान चौक ते गोरेवाडा रिंगरोडच्या सिमेंटीकरणाला २०१७ मध्ये सुरुवात करण्यात आली होती. परंतु अजूनही या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. दोनवेळा आराखडा बदलण्यात आला. त्यामुळे खर्च ३.२७ कोटीवरून ३.८८ कोटीवर गेला. एका कंपनीने कामाला सुरुवात केली होती. आता दुसरी कंपनी काम करीत आहे. काम अर्धवट असल्याने या परिसरातील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. १८ मीटर रुंदीचा सिमेंट कॉक्रिटचा रोड तयार करण्यात आला. परंतु दोन्ही बाजूला ३-३ मीटर जागेत पेवर ब्लॉक लावलेले नाही. अर्धवट फूटपाथ व पावसाळी नाली काढली नसल्याने आजूबाजूच्या लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरत आहे.
रस्त्यावरील व्हॉल्वमुळे अपघाताचा धोकागोरेवाडा तलावाची जलवाहिनी रस्त्यांच्या बाजूने गेली आहे. विविध विभागात समन्वय नसल्याने १८ मीटरचा सिमेंट काँक्रिटचा रोड तयार करण्याची परवानगी देण्यात आली. मंजुरी देताना जलवाहिनीचा विचार के ला नाही. आता व्हॉल्व रोडच्या मध्यभागात आल्याने पेवर ब्लॉकचा पर्याय शोधण्यात आला. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
११५५ मीटर लांबीगिट्टीखदान चौकाजवळील रिंगरोड चौकापूर्वी नाल्यापर्यंत करण्यात आलेल्या रोडची लांबी ११५५ मीटर आहे. रोडलगत गोरेवाडा तलावाची जलवाहिनी असल्याने १८ मीटर रुंदीच्या सिमेंट रोडला ६ मीटर सिमेंट काँक्रिट व त्यानंतर पेवर ब्लॉक लावण्याचा निर्णय घेण्यात आला. आराखडा तयार केल्यानंतर २०१७ मध्ये युनिटी इन्फ्रा प्रोेजेक्ट लिमिटेडला काम देण्यात आले. ७३३ मीटरचे काम केल्यानंतर कंपनीने दिवाळे घोषित केले. त्यामुळे रोडचे काम ठप्प पडले. निविदात फूटपाथ व पावसाळी नालीच्या बांधकामाचा समावेश होता. परंतु हे काम रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर करावयाचे होते. या कंपनीला २.६० कोटी देण्यात आले. त्यानंतर महापालिकेने फेरनिविदा काढली. इंजिनिअरिंग प्रा.लि.कंपनीला काम देण्यात आले. ४२२ मीटरच्या कामाचे कार्यादेश देण्यासाठी एक महिना लागला.
पालकांची चिंता वाढलीरोडच्या कडेला फूटपाथ नसल्याने पावसाचे पाणी साचते. परिसरात शाळा, महाविद्यालय आहे. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना यामुळे अपघात होण्याचा धोका असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. सिमेंट काँक्रिट रोड उंच असल्याने फूटपाथ व नालीचे काम शिल्लक असल्याने पाणी साचते. पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. त्यातच मोकाट जनावरांचा वावर असतो.