नागपूर : दूध संघांनी २७ रुपये लीटरनेच दुधाची खरेदी करण्याच्या आदेशाला दोन महिन्यांची स्थगिती दिली आहे. पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. ‘सरकारला दूध उत्पादक शेतकºयांची चिंता आहे आणि त्यांना समोर ठेवूनच निर्णय घेतले जातील. दूध संघांनी त्यांच्या खर्चांवर नियंत्रण आणावे,’ अशा कानपिचक्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिल्या.सुनील शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील आदी सदस्यांनी दूध दराबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी या वेळी २७ रुपयांचा भाव दुधाला देण्याची सक्ती दूध संघांना करून हे संघच मोडीत काढण्याचे प्रयत्न होत आहेत, अशी टीका केली. दूध संघांना स्वत:च्या भरवशावर हे करणे शक्य नाही. सरकारने अनुदान द्यायला हवे. दूध संघासारख्या संस्था उभारायला अक्कल लागते. त्यांच्याकडे सरकारने एका चष्म्यातून पाहू नये, असे अजित पवार म्हणाले. २७ रुपयांचा भाव देताना दूध संघांची अडचण होत असून, महानंदसारख्यांना त्यांच्या ठेवीतून पैसा द्यावा लागत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.२७ रुपये भाव न देणाºया दूध संघांना नोटिसा पाठविल्या जात आहेत. त्यांना स्थगिती देण्याची मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केली. ती राज्यमंत्री खोतकर यांनी मान्य केली. दूध संघांनी द्यावयाचे दूध दर ठरविण्यासंदर्भात, सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.दूध भुकटीच्या निर्यातीवर १० टक्के अनुदान केंद्राने द्यावे, यासाठी विनंती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री त्यासाठी पाठपुरावा करीत असून, लवकरच ती मान्य होईल, असेही राज्यमंत्री म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, मधुकर चव्हाण यांनी लक्षवेधीवरील चर्चेत भाग घेतला.पवारांनी केली अध्यक्षांची कोंडीअध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचाही औरंगाबादमध्ये दूध संघ आहे. याचा उल्लेख करून अजित पवार यांनी, आपण दुधाला किती भाव देता, असा सवाल अध्यक्षांना केला. त्यावर, पूर्वी २७ रुपये भाव दिला जात होता, पण आज २१, २२ रुपये दिला जातो, असे अध्यक्षांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.कुर्ला डेअरीचे खासगीकरण नाहीमुंबईतील कुर्ला डेअरीचे खासगीकरण करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे राज्यमंत्री खोतकर यांनी स्पष्ट केले. वरळी डेअरीबाबतही असे काही प्रस्तावित नसल्याचे ते म्हणाले.
२७ रु. लीटरने दूध खरेदीस तूर्त स्थगिती; दूध संघांनी खर्चावर नियंत्रण आणावे, मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:54 PM