लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून महापालिका हद्दीतील ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावीच्या प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण होऊन विशेष फेरीची प्रक्रियाही संपली आहे. आतापर्यंत २८ हजार ७७० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत, तर ३० हजार ४८० जागा अजूनही रिक्त आहेत. विशेष फेरीमध्ये ६ हजार ७१२ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी ३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले.
केंद्रीय प्रवेश समितीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात सुरू केली. प्रवेशाची पहिली फेरी झाल्यानंतर एसईबीसी आरक्षणामुळे दोन महिने प्रक्रिया ठप्प पडली. त्यानंतर ५ डिसेंबरपासून दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत १३ हजार २५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दुसऱ्या फेरीत ६ हजार ९६४ प्रवेश निश्चित झाले. तिसऱ्या फेरीत २ हजार ०८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यानंतर समितीतर्फे विशेष फेरी घेण्यात आली. यात ३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. प्रवेशाची पुन्हा एक फेरी होणार आहे. शहरात अकरावीच्या ५९ हजार २५० जागा आहे. ४२ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. झालेल्या सर्व फेऱ्यांमध्ये २८ हजार ७७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, ३० हजारावर जागा अजूनही रिक्तच आहेत.