लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी व मृतांची संख्या कमी करण्यासाठ पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची व लक्षणे असलेल्या रुग्णांची तातडीने तपासणी करून उपचाराखाली आणण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतु नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढताच शासकीय प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल मिळण्यास २४ ते ३० तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे तर खासगीमध्ये ४८ तासावर वेळ लागत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी जोखमीच्या गटातील रुग्णांची प्रकृती गंभीर होत आहे.प्रत्येक संशयिताची चाचणी आवश्यक आहे. तसे झाले नाही तर ते इतर लोकांमध्ये राहून कोरोना पसरवत राहतील. यामुळे चाचणी खूप महत्त्वाची आहे. नागपुरात मेयो, मेडिकल, एम्स, नीरी, माफसू व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असे मिळून सहा शासकीय प्रयोगशाळेत कोविडची आरटीपीसीआर तपासणी होते. हीच चाचणी करणाऱ्या सुमारे पाचवर खासगी प्रयोगशाळाही आहेत. मेडिकल व मेयोच्या प्रयोगशाळेत रोजचे नमुने तपासण्याची क्षमता प्रत्येकी ७००वर आहे. एम्सची क्षमता ३९०, माफसू, नीरी व विद्यापीठाच्या प्रयोगशाळेची क्षमता प्रत्येकी १२५ तर खासगी प्रयोगशाळेची साधारण एवढीच क्षमता आहे. खासगी व शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळेतील रोजची क्षमता तीन हजाराच्या घरात असताना त्याच्यावर नमुने येत आहे. विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ८४३४ चाचण्या झाल्या. यात ५०४५ रॅपिड अॅन्टिजन चाचण्या तर ३३८९ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. परिणामी, प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढत आहे.-खासगीमध्ये दोन दिवसाआड अहवालनागपूर जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्या काही खासगी प्रयोगशाळेचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवितात. त्याचा अहवाल येण्यास ४८ तासांचा कालावधी लागत आहे. काही खासगी प्रयोगशाळांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण तपासणीसाठी येत असल्याने त्यांनाही एवढाच उशीर होत आहे, परिणामी काही ठिकाणी दोन दिवसाचा कालावधी लागत आहे.-तपासणी क्षमता वाढविण्याची गरजमेयो, मेडिकल व एम्सच्या प्रयोगशाळेवर स्वत:च्या रुग्णालयातील रुग्णांसोबतच ग्रामीण, महानगरपालिका व इतर जिल्ह्यातून येणाºया नमुन्यांचीही भार आहे. यामुळे माफसू, नीरी व विद्यापीठाच्या प्रयोगशाळेची क्षमता वाढविण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.-आरटीपीसीआर चाचणीसाठी कठोर धोरण हवेरॅपिड अॅन्टिजन चाचणी जागोजागी होत आहे. ज्यांना लक्षणे नाहीत किंवा संपर्कात आलेले नाही तेही भीती पोटी तपासणी करीत आहे. यात निगेटिव्ह आल्यास थेट आरटीपीसीआर करीत आहे. परिणामी, या चाचण्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. रिपीट चाचणीचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे या चाचणीसाठी कठोर धोरण आखणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.