लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑनलाईन बुक केलेल्या पुस्तकाची किंमत तीनशे रुपये जास्त असल्याचे लक्षात आल्यामुळे एका तरुणीने कस्टमर केअरमध्ये चौकशी केली. तर सायबर गुन्हेगारांनी तिच्या खात्यातून ३० हजार रुपये काढून घेतले. ७ सप्टेंबरच्या सायंकाळी घडलेल्या या गुन्ह्याची तक्रार मिळाल्यानंतर शुक्रवारी एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.स्मिता बक्षी (वय ५८) यांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या एंजल नामक मुलीने अॅमेझॉनवर १५६१ रुपये किंमत असलेले एक पुस्तक आॅनलाईन बुक केले. काही दिवसानंतर त्या पुस्तकाची किंमत तीनशे रुपये कमी दिसल्यामुळे एंजेलने कस्टमर केअर सेंटरमध्ये फोन केला. पलीकडून बोलणाऱ्या आरोपीने तुम्हाला तुमची रक्कम परत हवी असेल तर जेवढ्या रुपयांचे पुस्तक आहे तेवढी रक्कम जमा करावी लागेल, असे म्हटले. त्याच्यावर विश्वास ठेवून एंजेलने रक्कम जमा केली. त्यानंतर २,१४५ रुपये गुगल पे ने पाठविले. सायबर गुन्हेगाराने नंतर तिच्या खात्यातून २९ हजार ४३१ रुपये वळते करून घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी फसवणूक तसेच आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
तीनशे रुपयांसाठी ३० हजार गमावले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 1:24 AM