CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोन महिन्यात रुग्णांची संख्या ३०४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 09:32 PM2020-05-12T21:32:44+5:302020-05-12T21:38:24+5:30

जागतिक आरोग्य संघटनेने जून, जुलैमध्ये कोरोनाचा संसर्ग उच्चांकी पातळीवर जाण्याची भीती व्यक्त केली आहे. तसे काहिसे चित्र नागपुरातही दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यात रुग्णांची संख्या ३०४ वर पोहचली आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या सहा दिवसात १०० रुग्णांची भर पडली.

304 patients in Nagpur in two months | CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोन महिन्यात रुग्णांची संख्या ३०४

CoronaVirus in Nagpur : नागपुरात दोन महिन्यात रुग्णांची संख्या ३०४

Next
ठळक मुद्देतीन गर्भवतींसह सहा रुग्ण पॉझिटिव्ह : कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी गाठली शंभरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिक आरोग्य संघटनेने जून, जुलैमध्ये कोरोनाचा संसर्ग उच्चांकी पातळीवर जाण्याची भीती व्यक्त केली आहे. तसे काहिसे चित्र नागपुरातही दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यात रुग्णांची संख्या ३०४ वर पोहचली आहे. धक्कादायक म्हणजे, गेल्या सहा दिवसात १०० रुग्णांची भर पडली. आज नोंद झालेल्या सहा रुग्णांमध्ये तीन गर्भवतींचा समावेश आहे. यातही समाधानकारक बाब म्हणजे, आज सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले. यात चार महिन्यांची गर्भवती असून बरे झालेल्यांची संख्या १०२ झाली आहे. नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्णाची नोंद ११ मार्च रोजी झाली. या महिन्यात केवळ १६ रुग्णांची नोंद झाली. एप्रिल महिन्याच्या १४ तारखेपर्यंत रुग्णांची संख्या वाढून ५० झाली. २४ एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या १०० झाली. या महिन्यात १२१ रुग्ण आढळून आले. मे महिन्याचा ६ तारखेला सर्वाधिक म्हणजे ६८ रुग्णांचे निदान झाले. यामुळे या महिन्याच्या केवळ १२ दिवसात १६७ रुग्णांची नोंद झाली. या दोन महिन्यात रुग्णांची संख्या ३०४ वर पोहचली आहे.

सहा दिवसातच गाठली शंभरी
नागपुरात रुग्णांची पहिली शंभरी गाठायला ४४ दिवस लागले, मात्र नंतर १२ दिवसातच शंभर रुग्णांची नोंद झाली तर आता सहा दिवसातच तिसऱ्यांदा शंभरी गाठली आहे. यामुळे पुढील दिवसात झपाट्याने रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘लॉकडाऊनला’ गंभीरतेने घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

मोमीनपुºयात चार रुग्ण घरातच आढळले
मनपाच्या आरोग्य विभागाच्यावतीने ४ मे रोजी मोमीनपुरा येथील गर्भवती महिलांसोबत ज्या महिला क्वारंटाईन न होता घरीच होत्या अशा ६० महिलांचे नमुने घेतले. नीरीच्या प्रयोगशाळेतून तपासण्यात आलेल्या या नमुन्यांच्या अहवालात चार महिला पॉझिटिव्ह आल्या. यात २५, २८ व ३० वर्षीय गर्भवती तर एक ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. या महिला घरीच पॉझिटिव्ह आढळून आल्याने वसाहतीत आणखी रुग्ण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शिवाय, मेयोच्या प्रयोगशाळेत सतरंजीपुरा येथील ४२ वर्षीय पुरुष व तकिया मोमीनपुरा येथील ५२ वर्षीय महिलेचा नमुना पॉझिटिव्ह आला. या रुग्णांसह आज सहा रुग्णांची नोंद झाली आहे.

चार महिन्याच्या गर्भवतीची कोरोनावर मात
सतरंजीपुरा येथील रहिवासी असलेल्या चार महिन्याच्या गर्भवतीचे नमुने २१ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आले होते. तिला मेयोमध्ये दाखल करण्यात आले. उपचाराला प्रतिसाद देत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने आपली दिनचर्या ठेवली आणि कोरोनावर मात केली. याच वसाहतीतील ३३ वर्षीय कोरोनाबाधित महिला बरी झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मेडिकलमधून सतरंजीपुरा येथील २८,३०, ३५ व ३६ वर्षीय महिलेचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या चारही महिलांचे नमुने १ मे रोजी पॉझिटिव्ह आल्याने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते.

कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ३८७
दैनिक तपासणी नमुने ५६८
दैनिक निगेटिव्ह नमुने ५६२
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ३०४
नागपुरातील मृत्यू ०४
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण १०२
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १७५७
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २४६६
पीडित-३०४-दुरुस्त-१०२-मृत्यू-४

Web Title: 304 patients in Nagpur in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.