नागपूर : अनलॉकनंतर हळुहळु एसटीची वाहतूक पूर्वपदावर येत आहे. परंतु अद्यापही एसटीच्या केवळ ६७ बसेस रस्त्यावर धावत असून ३३ टक्के बसेस मात्र आगारातच आहेत. त्यामुळे बहुतांश प्रवाशांना खासगी वाहतुकीच्या साधनांचा वापर प्रवासासाठी करावा लागत आहे. लवकरच उर्वरीत बसेसच्या माध्यमातून वाहतूक सुरू करण्यात येईल, असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. अशातच अत्यावश्यक कारणासाठी प्रवास या प्रशासनाच्या अटीमुळे प्रवासी घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे एसटीच्या केवळ २५ फेऱ्या सुरू होत्या. त्यानंतर अनलॉकची घोषणा झाल्यानंतर एसटी बसेसची संख्या वाढत आहे. परंतु गणेशपेठ आगारातून एकूण ६७ टक्के बसेसच रस्त्यावर धावत आहेत. अद्याप ३३ टक्के बसेस आगारातच ठप्प आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यांना प्रवासासाठी खासगी वाहतुकीकडे वळावे लागत आहे. उर्वरीत बसेसची वाहतूकही प्रवाशांसाठी लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
.............
एकूण बसेस : ८२
सध्या सुरू असलेल्या बसेस : ५५
आगारात उभ्या बसेस : २७
एकूण कर्मचारी : ४३५
चालक : १७०
वाहक : १२२
सध्या कामावर चालक : १७०
सध्या कामावर वाहक : १२२
या गावांना नाहीत बसेस उपलब्ध
सध्या मध्य प्रदेशातील वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे इंदूर, छिंदवाडा, लालबर्रा, शिवनी, मोहगाव, पांढुर्णा या ठिकाणच्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. नागपूर तसेच विदर्भातून या गावांना जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी या गावाला जाणाऱ्या बसेस तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
प्रवाशांना खासगी गाड्यांचा आधार
एसटीची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे मध्य प्रदेशासह इतर ठिकाणी जाणाऱ्या बसेसची संख्या कमी आहे. त्याचा प्रवाशांना त्रास होत आहे. परंतु महत्वाच्या कारणासाठी बाहेरगावी जाण्याची वेळ आलेले प्रवासी खासगी वाहतुकीच्या साधनांनी प्रवास करीत आहेत. एसटी महामंडळाच्या बसेस १०० टक्के रस्त्यावर येईपर्यंत प्रवाशांना खासगी वाहतुकीचाच आधार घ्यावा लागत आहे.
छिंदवाडा बस सुरू करावी
‘छिंदवाडा येथे विदर्भ तसेच नागपूर शहरातून असंख्य प्रवासी ये-जा करतात. परंतु सध्या एसटीच्या बसेस छिंदवाडा येथे पाठविणे बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटीने छिंदवाडा येथे जाणाऱ्या बसेस सुरू कराव्यात.’
-विवेक काळे, प्रवासी
मध्य प्रदेशातील फेऱ्या सुरू कराव्यात
‘मध्य प्रदेशात एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहतुकीच्या साधनांनी प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी प्रशासनाने मध्य प्रदेशातील वाहतूक सुरू करावी.’
-प्रशांत झाडे, प्रवासी
...............