नागपूर जिल्ह्यात चारापाणी न मिळाल्याने ३५ गुरांचा वाहनात गुदमरून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:27 AM2020-12-11T04:27:30+5:302020-12-11T10:57:19+5:30

नागपूर  : ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांनी गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक नागपूर-सावनेर-पांढुर्णा मार्गावरील खुर्सापार येथील ‘चेकपाेस्ट’वर तपासणीसाठी थांबविला. त्यात गुरे काेंबली ...

35 cattle suffocated to death in vehicle | नागपूर जिल्ह्यात चारापाणी न मिळाल्याने ३५ गुरांचा वाहनात गुदमरून मृत्यू

नागपूर जिल्ह्यात चारापाणी न मिळाल्याने ३५ गुरांचा वाहनात गुदमरून मृत्यू

Next

नागपूर  : ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांनी गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक नागपूर-सावनेर-पांढुर्णा मार्गावरील खुर्सापार येथील ‘चेकपाेस्ट’वर तपासणीसाठी थांबविला. त्यात गुरे काेंबली असल्याचे लक्षात येऊनही अधिकाऱ्यांनी याची माहिती देण्यास नऊ तास विलंब केला. या काळात ट्रक तिथेच थांबवून ठेवण्यात आला. या ट्रकमधील ३५ गुरांचा गुदमरून व चारापाणी न मिळाल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ८) घडली.

आरटीओ अधिकाऱ्यांनी नागपूरच्या दिशेने जात असलेला एमपी-०४/जीए-३१९६ क्रमांकाचा ट्रक खुर्सापार चेकपाेस्टवर तपासणीसाठी मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अडविला हाेता. त्यात गुरे काेंबली असल्याचे त्यांच्या वेळीच निदर्शनास आले हाेते. गुरांची अवैध वाहतूक ही पाेलीस विभागाच्या अखत्यारित येत असल्याने त्यांनी याबाबत लगेच केळवद पाेलीस ठाण्याला सूचना देणे क्रमप्राप्त हाेते.

आरटीओ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची माहिती रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दिली. त्यामुळे पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यांना त्या ट्रकमध्ये ४६ जनावरे काेंबली असल्याचे तसेच त्यातील ३५ गुरांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. पाेलिसांनी मृत गुरांची वेळीच विल्हेवाट लावून ११ गुरांना देवलापार (ता. रामटेक) येथील गाेरक्षणमध्ये पाठविण्याची व्यवस्था केली. या कारवाईमध्ये ५ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी दिली. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक अर्जुन राठाेड यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

माहिती देण्यास दिरंगाई का?

केळवद पाेलीस आरटीओच्या खुर्सापार चेकपाेस्टजवळ नेहमीच कारवाई करीत गुरांच्या अवैध वाहतुकीची वाहने पकडतात. या ट्रक व गुरांच्या वाहतुकीबाबत पाेलिसांना आधी कुणीही सूचना अथवा माहिती दिली नव्हती. आरटीओ अधिकाऱ्यांनी हा ट्रक ओव्हरलाेड असावा म्हणून त्याचे वजन करण्यासाठी थांबविला हाेता. त्यात गुरे काेंबली असल्याचे तसेच ही बाब आपल्या अखत्यारित येत नसल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांना माहीत हाेते. तरीही त्यांना याबाबत पाेलिसांना सूचना देण्यास १० तासांचा विलंब केला. हा विलंब प्रकरण ‘मॅनेज’ करण्यासाठी केल्याचेही सूत्रांनी सांगितले. हा संपूर्ण घटनाक्रम चेकपाेस्टवरील ‘सीसीटीव्ही कॅमेऱ्यात’ कैद आहे.

Web Title: 35 cattle suffocated to death in vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात