नागपूर : मेयो, मेडिकलमधील वरिष्ठ डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी सलग पाच दिवस कामबंद आंदोलन पुकारल्याने त्याचा सर्वाधिक फटका शस्त्रक्रियांना बसला. सर्वच नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. आता संप मिटला असला तरी दोन्ही रुग्णालये मिळून जवळपास ३७०वर शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. परिणामी, बाहेरगावावरून आलेल्या रुग्णांना दुखणे सहन करीत शस्त्रक्रियेच्या दिवसाची वाट पाहण्याची वेळ आली आहे.
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या (एमएसएमटीए) नेतृत्वात ५ जानेवारीपासून आंदोलन केले. अध्यापन बंद करून परीक्षेवरही बहिष्कार टाकला. परंतु, सरकार यातून मार्ग काढत नसल्याचे पाहून १४ मार्चपासून कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले. वरिष्ठ डॉक्टरच नसल्याने याचा सर्वाधिक परिणाम शस्त्रक्रियांवर झाला. १८ मार्च रोजी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले असले तरी शनिवार व रविवार सुटीचा दिवस आल्याने २१ मार्चपासून शस्त्रक्रियांना सुरुवात झाली. तब्बल सहा दिवस नियोजित शस्त्रक्रिया ठप्प होत्या.
-६० टक्क्यांहून कमी शस्त्रक्रिया
इतर दिवसांच्या तुलनेत मेयो, मेडिकलमध्ये ६० टक्क्यांहून कमी शस्त्रक्रिया झाल्या. केवळ इमर्जन्सी शस्त्रक्रिया होत होत्या. नियोजित शस्त्रक्रियांना पुढे ढकलण्यात आले होते. यामुळे रुग्ण व नातेवाइकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. संप मिटला असला तरी मेडिकलमध्ये जवळपास २५०वर, तर मेयोमध्ये १२०वर नियोजित शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत.
-ऑर्थाेपेडिक व जनरल सर्जरीचे रुग्ण अडचणीत
मेयो, मेडिकलमध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया जनरल सर्जरी व ऑर्थाेपेडिक विभागात होतात. सध्या याच दोन्ही विभागात शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. रुग्णांना बेड मिळणेही कठीण झाले आहे, तर त्यांचे नातेवाईक आज नाही तर उद्या शस्त्रक्रिया होईल या आशेवर उघड्यावर दिवस-रात्र काढत आहेत.
-१५ दिवसांपासून शस्त्रक्रियेची प्रतीक्षा
मेडिकलच्या आर्थाे विभागात शस्त्रक्रियेसाठी गोंदियाहून आलेल्या रुग्णाचे नातेवाईक संपत यांनी सांगितले की, अपघातामुळे पायाला मोठी दुखापत झाली. डॉक्टरांनी दोन-तीन दिवसांत शस्त्रक्रिया होईल असे सांगितले, परंतु आता १५ दिवस होऊनही शस्त्रक्रियेची प्रतीक्षा आहे.
-पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी दहा दिवसांची वाट
पोटावरील शस्त्रक्रियेसाठी भंडाराहून मेयोमध्ये आलेल्या रुग्णाचा भाऊ सुनील याने सांगितले की, संप होण्याच्या एक दिवसापूर्वी शस्त्रक्रिया होणार होती. परंतु, त्या दिवशी झालीच नाही. नंतर संपामुळे सात दिवस शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. आता शस्त्रक्रिया कधी होणार हे डॉक्टर सांगत नाहीत. विचारले तर डॉक्टर रागावतात.