नरेश डोंगरे ।
नागपूर - उमेदीच्या काळात भावी पिढीने भविष्याची साखरपेरणी करावी. आयुष्य कसे सुंदर जगता येईल, याचे प्लॅनिंग करावे, असा हितोपदेश घरची, बाहेरची मंडळी देतात. मात्र, या हितोपदेशाला झुगारून अनेक तरुण चक्क गुन्हेगारीकडे वळत आहेत. हे धक्कादायक वास्तव नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या तरुण कैद्यांच्या संख्येवरून लक्षात यावे.
नागपुरातील मध्यवर्ती कारागृहाची संख्या १७०० कैद्यांची आहे. मात्र, या कारागृहात तब्बल २४०० गुन्हेगार आहेत. रोजच त्यांचे जाणे-येणे सुरू असल्याने कारागृह नेहमीच हाऊसफुल्ल दिसते. विशेष म्हणजे, कारागृहात असलेल्या कैद्यांपैकी सुमारे ४० टक्के कैदी तरुणतुर्क आहेत. चोऱ्याचकाऱ्या आणि हाणामारीच नव्हे तर हत्या, हत्येचा प्रयत्न, अमली पदार्थ विक्री, शस्त्र बाळगणे अथवा विकणे, विनयभंग, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यातील हे आरोपी आहेत. एकूण कैद्यांच्या तुलनेत तरुण कैद्यांची ही संख्या भुवया उंचवायला लावणारी आहे.
१) कारागृहाची क्षमता - १७००
सध्या एकूण बंदिवान- २४२१
१८ ते ३० वयोगटातील - १०९४
३१ ते ५० वयोगट -१०७८
५१ पेक्षा जास्त वयोगटातील -२४९
२) हजारांवर बंदिवान ३० च्या आत
पालकांचे लक्ष आहे का ?
घरातील तरुण गुन्हेगारीत सक्रिय झाला असल्याची माहिती पालकांना नसते का, की पालक त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नसतात, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यावर समाजातील विविध मंडळींचे वेगवेगळे मत आहे. मुलगा कुठे जातो, कुणासोबत उठतो-बसतो, त्याकडे २४ तास कोणताही पालक लक्ष ठेवू शकत नाही. अलीकडे तरुणाई स्मार्ट आणि फास्ट आहे. झटपट श्रीमंती आणि शानशौकिनीचे जीवन जगण्यासाठी आपण काय करतो, याचे भानच तो बाळगत नाही. परिणामी, तो कळत-नकळत गुन्हेगारीकडे वळतो, असे सामाजिक प्रश्नांची जाण असलेली मंडळी अन् पोलीस अधिकारी सांगतात.
“मोठ्या आणि गंभीर गुन्ह्यात तरुणांची वाढती संख्या हा चिंतेचा अन् चर्चेचाही विषय ठरतो. कारागृहात आलेल्या तरुणांचे समुपदेशन आणि पुनर्वसनाच्या संबंधाने आमचे काम सुरू असते.’’
- अनुप कुमरे
कारागृह अधीक्षक, नागपूर