सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ४१५ बॉटल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 11:56 PM2019-06-28T23:56:57+5:302019-06-28T23:58:04+5:30
रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने शुक्रवारी सकाळी प्लॅटफार्म क्रमांक ६ वर पोहोचलेल्या १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसमधून दारूच्या ४१५ बॉटल पकडल्या. त्याची किंमत २६ हजार ९७५ रुपये आहे. परंतु दारू पकडलेली रेल्वेगाडी, घटनेची वेळ आणि पकडलेली दारू यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने शुक्रवारी सकाळी प्लॅटफार्म क्रमांक ६ वर पोहोचलेल्या १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसमधून दारूच्या ४१५ बॉटल पकडल्या. त्याची किंमत २६ हजार ९७५ रुपये आहे. परंतु दारू पकडलेली रेल्वेगाडी, घटनेची वेळ आणि पकडलेली दारू यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वे सुरक्षा दलाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी ८.२० वाजता मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसच्या जनरल कोच क्रमांक सीआर १५४३० मध्ये प्लास्टिकचे दोन पोते संशयास्पद स्थितीत आढळले. त्यात मध्य प्रदेशातील दारूच्या ४१५ बॉटल होत्या. परंतु मुंबई ते नागपूर प्रवासात मध्य प्रदेशातील दारू मिळत असलेले कोणतेच गाव नसून मुंबई मार्गे नागपुरात दारू कशी आणली जाईल हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दररोज नागपुरातून वर्धा, चंद्रपूरला जाणाऱ्या रेल्वेगाड्यात दारूची तस्करी होते. पहिल्यांदा दारुबंदी असलेल्या जिल्ह्यातून नागपुरात दारू आल्याची घटना घडली आहे.
कारवाई आश्चर्यचकित करणारी
आयआरसीटीसीच्या वेळापत्रकानुसार सेवाग्राम एक्स्प्रेस नागपुरात पोहोचण्याची वेळ सकाळी ६.१० वाजताची आहे. ही गाडी १.५७ तास उशिराने सकाळी ८.०७ वाजता नागपुरात पोहोचली. आरपीएफने कारवाईची वेळ ८.२० वाजता दाखविली आहे. गाडी येताच १३ मिनिटात आरपीएफचे जवान दारूच्या तस्करीची शक्यताच नसलेल्या सेवाग्राम एक्स्प्रेसच्या जनरल कोचपर्यंत गेलेच कसे हा प्रश्न आहे. तो पर्यंत गाडीतील प्रवासीच खाली उतरले नसतील. याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ही कारवाई बनावट असल्याची शंका व्यक्त करण्यात येत असून या घटनेचा तपास करण्याची मागणी होत आहे.