फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच ४३ रुग्णांची नोंद; कोरोनाचे १०२ ॲक्टिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 03:20 PM2022-06-11T15:20:47+5:302022-06-11T15:24:33+5:30
एप्रिल महिन्यात पाचच्या आत तर मे महिन्यात १०च्या आत रुग्ण होते. परंतु, जून महिन्याच्या सुरूवातीपासूनच रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
नागपूर : कोरोनाची तिसरी लाट जानेवारी महिन्यात आल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात ती ओसरली. त्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णांची संख्या ४३ झाली. यातील दोन रुग्णांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज पडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. रुग्णांची एकूण संख्या ५,७७,९७६ झाली असून, मृतांची संख्या १०,३३८वर स्थिर आहे.
नागपूर जिल्ह्यात जानेवारी महिन्यात ६७,५१४ तर फेब्रुवारीमध्ये १५,९३३ रुग्णांची नोंद होती. त्यानंतर झपाट्याने रुग्णसंख्या कमी होत गेली. विशेष म्हणजे, २७ फेब्रुवारी रोजी ५८ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर मार्च महिन्यात ३७, एप्रिल महिन्यात पाचच्या आत तर मे महिन्यात १०च्या आत रुग्ण होते. परंतु, जून महिन्याच्या सुरूवातीपासूनच रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
- शहरात २९ तर ग्रामीणमध्ये ११ पॉझिटिव्ह
नागपूर जिल्ह्यात मागील २४ तासात चाचण्यांची संख्या वाढली. शुक्रवारी २,३२६ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत १.८ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात शहरात २९, ग्रामीणमध्ये ११ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण आहेत.
- १० दिवसात १३२ रुग्ण
१ जून रोजी ९ रुग्णांची नोंद असताना १० जून रोजी ७९ टक्क्याने रुग्णांमध्ये वाढ झाली. १० दिवसात १३२ रुग्ण आढळले. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून १०२ झाली. यात शहरात ६७, ग्रामीणमध्ये ३२ तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण आहेत.
- मार्चनंतर पहिल्यांदाच रुग्ण भरती
मार्च महिन्यानंतर शासकीयसह खासगी रुग्णालयांत कोरोनाचा एकही रुग्ण भरती नव्हता. परंतु, शुक्रवारी किंग्जवे हॉस्पिटलमध्ये बेसा येथील ७४ वर्षीय पुरुष तर रेल्वे कॉलनी येथील ८१ वर्षीय महिलेला भरती करण्यात आले. येथील डॉक्टरांच्या मते, दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. रुग्णांची प्रकृती स्थिर असून, सात दिवसानंतर सुट्टी दिली जाईल.
- कोरोनाचा वाढता ग्राफ
१ जून : ०९ रुग्ण
२ जून : ०९ रुग्ण
३ जून : ०४ रुग्ण
४ जून : ०३ रुग्ण
५ जून : ०५ रुग्ण
६ जून : ०३ रुग्ण
७ जून : २५ रुग्ण
८ जून : १५ रुग्ण
९ जून : १६ रुग्ण
१० जून : ४३ रुग्ण