दीक्षाभूमी परिसरातून ४५० टन कचरा संकलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 07:37 PM2019-10-09T19:37:34+5:302019-10-09T21:04:27+5:30
दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो बौद्ध बांधवांच्या सुविधेसाठी महापालिकेतर्फे सोमवार ते बुधवार असे तीन दिवस अविरत सेवा प्रदान करण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या कालावधीत दीक्षाभूमी परिसरातून ४५० टन कचरा संकलित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो बौद्ध बांधवांच्या सुविधेसाठी महापालिकेतर्फे सोमवार ते बुधवार असे तीन दिवस अविरत सेवा प्रदान करण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या कालावधीत दीक्षाभूमी परिसरातून ४५० टन कचरा संकलित केला.
महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार दीक्षाभूमी येथे अविरत २४ तास सेवा प्रदान करण्यात आली. मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासोबतच स्वच्छता विभागातर्फे येथील कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. परिसरातील स्वच्छतेसाठी कचरा संकलन करणाऱ्या ३० गाड्या, महापालिकेचे ५०० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. याशिवाय कनकचे १२५ कर्मचारी मदतीला होते. दीक्षाभूमी परिसरात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र तात्पुरती ८०० प्रसाधनगृहे तयार करण्यात आली. या प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेसाठी ९० कर्मचारी नियुक्त करण्यात आले. तसेच चार फिरते प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याचे २०० तात्पुरते नळ लावण्यात आले होते. मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे वैद्यकीय सेवा, अग्निशमन सुविधा व परिवहन सेवा आदी प्रदान करण्यात आल्या.
अभिजित बांगर व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दीक्षाभूमी व परिसरातील सुविधेची वेळोवळी पाहणी करुन व्यवस्थेचा आढावा घेतला. नागरिकांना २४ तास अविरत सेवा मिळावी यासाठी आयुक्तांच्या निर्देशानुसार विविध विभागाचे अधिकाºयांनीही २४ तास कर्तव्य बजावले. अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, धनंजय मेंढुलकर, ए.एस.मानकर, अविनाश बारहाते, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, स्वच्छ सर्वेक्षणचे नोडल अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, अतिरिक्त सहायक आरोग्य डॉ. विजय जोशी, कनकचे व्यवस्थापक कमलेश शर्मा, सर्व झोनचे झोनल अधिकारी, सर्व आरोग्य निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी आदींनी तीन दिवस अविरत सेवा प्रदान करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.
दीक्षाभूमीवर अनुयायांच्या सुविधेकरिता मनपातर्फे नियंत्रण कक्ष उभारण्यात आले. या नियंत्रण कक्षाद्वारे सर्व सुविधांकडे लक्ष ठेवून नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यात आल्या. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी गेल्या सोमवारपासूनच बौद्ध बांधवांचे दीक्षाभूमीवर आगमन झाले. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने परिसरात स्वच्छता ठेवण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले होते.
दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी विविध संस्था आणि नागरिकांकडून मोफत भोजनदान केले जाते. भोजनदान करण्यात येणाऱ्या ठिकाणी घाण होऊ नये यासाठी नियमित स्वच्छता करण्यात आली. दीक्षाभूमीकडे येणारे रहाटे कॉलनी, नीरी रोड, लक्ष्मीनगर, काचीपुरा रामदासपेठ आदी मार्गांची नियमित स्वच्छता करण्यात आली. बुधवारी सर्व मार्गांची स्वच्छता करुन सायंकाळपर्यंत सर्व मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.
प्लास्टिक मुक्तीबाबत जनजागृती
दीक्षाभूमी परिसरात लावण्यात आलेल्या एल.ई.डी. स्क्रीन, बॅनर, फलक आदींद्वारे ‘सिंगल यूज प्लास्टिक मुक्ती’बाबत जनजागृती करण्यात आली. दीक्षाभूमीच्या संपूर्ण परिसरातील स्टॉल्सपुढे कचरा पेट्यांची व्यवस्था करण्यात आली. मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना जॅकेट, हॅन्डग्लोज, गमबूट, मास्क आदी साहित्य प्रदान करुन ते परिधान करूनच सेवा बजावण्याचे निर्देश दिले होते. अनुयायांच्या सुविधेसाठी मनपाच्या परिवहन विभागातर्फै आपली बसची विशेष सेवा पुरविण्यात आली. रेल्वे स्टेशन, बस स्थानक, बर्डी आदी ठिकाणाहून थेट दीक्षाभूमीसाठी बस सेवा प्रदान करण्यात आली.