लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्लास्टिकची बॉटल आणि झाकण तयार करण्याची मशीन लावून दर महिन्यात लाखो रुपयांचा व्यवहार होत असल्याची बतावणी करून एक युवक ४८ लाख रुपये घेऊन फरार झाला. या घटनेत एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.ओमप्रकाश शर्मा (२८) असे आरोपी युवकाचे नाव आहे. त्याने जयताळा मार्गावर मंगळमूर्ती चौकात नागपूर इंडस्ट्रीजच्या नावाने कार्यालय सुरू केले होते. त्याने जाहिरात देऊन नागरिकांना फसवले. जाहिरातीत प्लास्टिकची बॉटल आणि झाकण तयार करण्याची मशीन लावून दर महिन्यात लाखो रुपये कमवून यशस्वी उद्योजक होण्याचे आमिष दाखविले. नागरिक शर्मा त्याच्या संपर्कात आले. त्याने स्वत:ला कंपनीचा प्रतिनिधी असून दिल्लीवरून मशीनचा पुरवठा होत असल्याचे सांगितले. दिल्लीवरून स्वत: मशीनची खरेदी केल्यास एक ते दीड लाख रुपये अधिक द्यावे लागतील असे त्याने सांगितले. शर्मा याने लहान मशीनची किंमत ४.५० लाख आणि मोठ्या मशीनची किंमत ६.५० लाख सांगितली. मशीनची खरेदी केल्यानंतर कच्च्या मालाचा पुरवठा आणि उत्पादनाच्या विक्रीची ग्वाही दिली. मशीनपासून अनेक आकाराच्या बॉटल तयार होत असल्याचे सांगितले. शर्मावर भरवसा असल्यामुळे अनेक नागरिक तयार झाले. गुरुदेवनगर येथील मनोज मोटघरे यांनी ४.५० लाख, विनोद मोहाडीकर यांनी ६.५० लाख, सचिन चव्हाण यांनी ४.५० लाख, वैभव निकम यांनी ४.५० लाख, राहुल झाडे यांनी ६.५० लाख, मयुर खिरडकर यांनी ४.५० लाख, दीपक शिंदे आणि नीलेश तांबे यांनी ६.५० लाख रुपये शर्माला दिले. पैसे मिळाल्यानंतर दोन दिवसात दिल्लीवरुन मशीन नागपुरात आणण्याची बतावणी त्याने केली. काही वेळ निघून गेल्यानंतर त्याने ३१ जानेवारीपर्यंत मशीन मिळणार असल्याचे सांगितले. ३१ जानेवारीला नागरिकांनी संपर्क साधला असता त्याने ३ फेब्रुवारीला रात्री १० वाजेपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या पत्त्यावर मशीन पोहोचणार असल्याची माहिती दिली. त्याच्यावर विश्वास ठेवून नागरिक परत गेले. ३ फेब्रुवारीला मशीन न आल्यामुळे नागरिक ४ फेब्रुवारीला त्याच्या कार्यालयात पोहोचले. त्यानंतर त्यांना शर्मा कार्यालय बंद करून पळून गेल्याचे समजले. त्याचा मोबाईलही बंद होता. कार्यालयातील कर्मचाºयांनीही शर्मा याच्याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पीडित नागरिक एमआयडीसी ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नागपुरात उद्योजक बनविण्याचे आमिष दाखवून ४८ लाखांनी गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 11:15 PM
प्लास्टिकची बॉटल आणि झाकण तयार करण्याची मशीन लावून दर महिन्यात लाखो रुपयांचा व्यवहार होत असल्याची बतावणी करून एक युवक ४८ लाख रुपये घेऊन फरार झाला. या घटनेत एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देआरोपी फरार : एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल