उपकरणांच्या खरेदीसाठी नागपूरच्या मेया इस्पितळाला पाच कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 09:03 PM2017-12-04T21:03:27+5:302017-12-04T21:16:10+5:30
मेयोच्या सुवर्ण महोत्सवाच्यानिमित्ताने रुग्णसेवा आणखी अद्ययावत व्हावी, या हेतूने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खनिकर्म निधीमधून पाच कोटी रुपये देण्याची घोषणा सोमवारी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित आढावा बैठकीत केली.
ऑनलाइन लोकमत
नागपूर : मेयोच्या सुवर्ण महोत्सवाच्यानिमित्ताने रुग्णसेवा आणखी अद्ययावत व्हावी, या हेतूने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खनिकर्म निधीमधून पाच कोटी रुपये देण्याची घोषणा सोमवारी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित आढावा बैठकीत केली. यावेळी पालकमंत्र्यांनी कोणत्या विभागाला किती निधी द्यायचा, यावरही संबंधित प्रमुखांशी चर्चा केली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) ५० वर्षे पूर्ण होत आहेत. २२ ते २४ डिसेंबरदरम्यान सुवर्ण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री बावनकुळे यांनी ही बैठक बोलविली होती. यावेळी त्यांनी खनिकर्म निधीमधून मिळणाºया ९० कोटी रुपयांमधून पाच कोटी रुपये मेयोला उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती दिली. हा निधी रुग्णालयाला आवश्यक यंत्रसामुग्री खरेदी करण्याच्या सूचनाही दिल्या. विशेष म्हणजे, पालकमंत्र्यांनी लगेच खनिकर्म विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना याविषयी फोनवरून माहिती दिली, सोबत नागपूर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याशीही फोनवरून संपर्क साधून मेयो रुग्णालयासाठी हा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. या निधीच्या खर्चावर उपस्थित विविध विभागांच्या प्रमुखांशी चर्चा केली तसेच सायंकाळपूर्वी प्रस्ताव तयार करून त्याची मंजुरी घेण्याचे निर्देशही दिले. यावेळी आ. विकास कुंभारे, अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे, अभ्यागत मंडळाचे सर्व सदस्य व रुग्णालयाचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
-पाळणाघराचा प्रस्ताव
अनेक रुग्ण माता आपल्या लहान मुलांसोबत उपचारासाठी रुग्णालयात येतात. त्या मुलांना पाहण्यासाठी नातेवाईक राहतोच असे नाही. अशा मुलांची आबाळ होऊ नये म्हणून परिचारिकांनी रुग्णालयात पाळणाघर सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना
पालकमंत्र्यांनी दिल्या. मेयोच्या अभ्यागत मंडळाचे सदस्य डॉ. शिंगणे यांनी हे पळणाघर चालविण्यासाठी सामाजिक संस्थांची नेमणूक करावी, असेही ते म्हणाले.
-थुंकणाºयांवरील कारवाईसाठी स्वच्छतादूत
बावनकुळे म्हणाले, रुग्णालयाच्या आत थुंकणाºयांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या पाच स्वच्छतादूताची नेमणूक मेयोसाठी करण्यात येईल. हे स्वच्छतादूत रुग्णालयात फिरून थुंकणाºयांवर दंडात्मक कारवाई करतील.