नागपुरातील संजय भाकरे यांच्या ‘अनिमा’ला पाच राज्य पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 07:36 PM2018-12-05T19:36:08+5:302018-12-05T19:40:37+5:30
संजय भाकरे फाऊंडेशनची निर्मिती असलेल्या ‘अनिमा’ या नाटकाने ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिकासह पाच पुरस्कारावर बाजी मारली आहे. निर्मितीसह दिग्दर्शन व प्रकाशयोजनेचा प्रथम पुरस्कार या नाटकाला प्राप्त झाला. अनिमानंतर द्वितीय पुरस्कार प्राप्त रंगरसिया थिएटरचे ‘प्रवेश सरला’ या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संजय भाकरे फाऊंडेशनची निर्मिती असलेल्या ‘अनिमा’ या नाटकाने ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिकासह पाच पुरस्कारावर बाजी मारली आहे. निर्मितीसह दिग्दर्शन व प्रकाशयोजनेचा प्रथम पुरस्कार या नाटकाला प्राप्त झाला. अनिमानंतर द्वितीय पुरस्कार प्राप्त रंगरसिया थिएटरचे ‘प्रवेश सरला’ या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने १५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर यादरम्यान राज्य नाट्य स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विविध निर्मिती संस्थांच्या एकूण १९ नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये अनिमाने बाजी मारली. या नाटकासाठी दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार संजय भाकरे यांनी तर प्रकाशयोजनेचा प्रथम पुरस्कार ऋषभ धापोडकर यांना देण्यात आला. सतीश काळबांडे यांना नेपथ्यासाठी द्वितीय पुरस्कार आणि राखी वैद्य या अभिनेत्रीने उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक प्राप्त केले. नाटकातील अभिनेता प्रतीक गान यानेही अभिनयाचे प्रमाणपत्र प्राप्त केले. या स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक डॉ. राजेंद्रप्रसाद युवा कल्याणकारी संस्था, उमरेडद्वारे निर्मित ‘फर्टिलायझर’या नाटकाने प्राप्त केले आहे. प्रवेश सरला या नाटकासाठी दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक संदीप दाबेराव तर
प्रकाशयोजनेसाठी मिथून मित्रा यांना द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. नेपथ्याचे प्रथम पारितोषिक अभिषेक वेल्सरवार आणि गौरव श्रीरंग याला अभिनयाचे रौप्यपदक प्राप्त झाले. स्पर्धेच्या इतर पुरस्कारामध्ये रंगभूषेचे प्रथम पारितोषिक प्रज्ञा गणवीर यांनी ‘भारताचे आद्यनाटककार भदन्त अश्वघोष’ या नाटकासाठी प्राप्त केला. द्वितीय पुरस्कार लालजी श्रीवास यांनी फतवा या नाटकासाठी मिळविला. दीपलक्ष्मी भट, डॉ. प्राची महाजन, अपर्णा लखमापुरे, विद्या खोब्रागडे, मंगेश काळे, श्रेयस अतकर, निखिल टोंगळे यांना गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून संदीप देशपांडे, वासुदेव विष्णूपुरीकर व शमा सराफ यांनी जबाबदारी पार पाडली.
गेल्या ४० वर्षांपासून नाट्यक्षेत्र व रंगभूमीची सेवा करणाऱ्या संजय भाकरे यांनी आतापर्यंत अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती केली असून अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत. या पुरस्काराने नव्याने त्यांच्या प्रतिभेला गौरविण्यात आले आहे.