सुमारे २५ मीटर उंचीवरून धावणार मेट्रो
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महा मेट्रोने निर्माणकार्याच्या सुरुवातीपासूनच विविध नाविन्यपूर्ण निर्माणकार्य केले असून, प्रत्येक ठिकाणचे डिझाईन आंतरराष्ट्रीय आर्किटेक्टचा उत्कृष्ट नमुना आहे. ज्यामध्ये मल्टीलेअर ट्रान्सपोर्ट सिस्टिम,डबलडेकर उड्डाणपूल इत्यादींचा समावेश आहे. महा मेट्रो पूर्व पश्चिम कॉरिडोरवर देशातील २३१ मीटर लांबीचा ब्रिज आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आनंद टॉकीज, सीताबर्डी ते कॉटन मार्केटपर्यत निर्माण करीत आहे. अशाप्रकारचा हा पूल देशात तिसऱ्या क्रमांकाचा असणार आहे.
बॅलस कॅटिलिव्हर ब्रिजला कॅटिलिव्हर कन्स्ट्रक्शन ब्रिज म्हणूनदेखील ओळखल्या जातो. २३१.२ मी. लांबीचा हा पूल नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या रिच ४ मार्गिकेवर आहे. सद्यस्थितीत आनंद टॉकीज येथे सीताबर्डी ते कॉटन मार्केटदरम्यान निर्माणकार्य सुरू आहे. या ठिकाणचे निर्माणकार्य मध्य रेल्वेने मंजूर केलेल्या योजनेनुसार जेव्हा रेल्वेगाड्या प्रतिबंधित असतात रेल्वे ट्रॅफिक ब्लॉकदरम्यान हे कार्य केल्या जाते. साधारणतः जास्तीतजास्त तीन तासाकरिता रात्रीच्या वेळी जेव्हा ट्रेनचे संचालन कमी असते त्यावेळी या ठिकाणी निर्माणकार्य केल्या जाते. महा मेट्रोने आतापर्यंत ५२ टक्के या ठिकाणचे निर्माणकार्य सुरक्षा मार्गदर्शकाचे पालन करून रेल्वे वाहतुकीला अडथळा न पडता पूर्ण केले आहे. हे केवळ योग्य टीम वर्क, नियोजन, डिझाईन व रेखाचित्रांची मंजुरी, रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे ब्लॉक करता रेल्वे अधिकाऱ्याशी समन्वय साधून शक्य झाले आहे. भारतीय रेल्वेच्या ट्रॅकवरून १०० मीटरचा एक स्पॅनचे (३ मीटरचा एक गर्डर) असणार आहे. या पुलाचे कार्य पूर्ण झाल्यावर तो अभियांत्रिकीच्या क्षेत्रात एक आकर्षण ठरणार आहे.