५७६१ चाचण्या, ९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:08 AM2021-07-31T04:08:30+5:302021-07-31T04:08:30+5:30
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आठ हजारांच्या जवळपास गेलेली रुग्णसंख्या मागील २७ दिवसांत २५वर गेली नाही. शिवाय मागील २१ ...
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आठ हजारांच्या जवळपास गेलेली रुग्णसंख्या मागील २७ दिवसांत २५वर गेली नाही. शिवाय मागील २१ दिवसांत शून्य मृत्यूची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी ५,७६१ चाचण्यांतून ९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्हिटीचा दर ०.१५ टक्क्यांवर आला आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोना पूर्णत: नियंत्रणात आल्याचे चित्र दिसून येत आहे. जून महिन्याचा सुरुवातीला दोनच दिवस रुग्णांची संख्या २००वर गेली होती. त्यानंतर ही संख्या २५वर आली. जुलै महिन्याच्या सुरुवातीचे तीन दिवस रुग्णसंख्या ४०वर होती. त्यानंतर एकच दिवस २५ रुग्ण आढळून आले. मागील तीन दिवसांपासून दैनंदिन रुग्णांची संख्या १०च्या आत आहे. शहरासोबतच ग्रामीणमध्ये कोरोनाचा ग्राफ नीचांकावर आला आहे. शुक्रवारी शहरात ४,६८३ चाचण्यांमधून ५, तर ग्रामीणमध्ये १०७८ चाचण्यांमधून ४ रुग्ण आढळून आले. ११ रुग्ण बरे झाले असून, कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९७ टक्क्यांवर पोहोचले आहे.
-शहरात ५८९२, ग्रामीणमध्ये २६०३ मृत्यू
मागील १६ महिन्यांत शहरात ३,३९,९६४ रुग्ण व ५,८९२ मृत्यू, तर ग्रामीणमध्ये १,४६,०९२ रुग्ण व २६०३ कोरोनाबाधितांचे जीव गेले आहेत. शहरात आतापर्यंत ३,३३,९१७ तर ग्रामीणमधून १,४३,४५५ असे एकूण ४,८२, ५५२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरातील १५५, ग्रामीणमधील ३४, तर जिल्ह्याबाहेरील ४ कोरोनाचे रुग्ण सक्रिय आहेत.
:: कोरोनाची शुक्रवारची स्थिती
दैनिक चाचण्या : ५७६१
शहर : ५ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ४ रुग्ण व ० मृत्यू
एकूण बाधित रुग्ण : ४,९२,८६१
एकूण सक्रिय रुग्ण : १९३
एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८२,५५२
एकूण मृत्यू : १०११६