६३७ अंगणवाड्या स्वतंत्र इमारतीविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:06 AM2020-12-28T04:06:37+5:302020-12-28T04:06:37+5:30
नागपूर : एकात्मिक बाल विकास अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येतो. जिल्ह्यातील आजही ...
नागपूर : एकात्मिक बाल विकास अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येतो. जिल्ह्यातील आजही ६३७ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे त्या सरकारी शाळा, समाज मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय भाड्याच्या खोलीत आहे.
बालवयातील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणाबरोबरच त्यांचे पोषण करण्याचे काम अंगणवाडीच्या माध्यमातून करण्यात येते. नियमानुसार १ हजार लोकसंख्येमागे एक अंगणवाडी सुरू करता येते. अंगणवाडीला मुलांच्या संख्येचे बंधन नसते. नागपूर जिल्ह्यात २४२३ अंगणवाड्यात आहेत. मुलांना पोषण आहार देण्याबरोबरच आरोग्यासह अन्य कामे देखील अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या माध्यमातून केली जातात. महिला व बाल कल्याण विभागाचे या अंगणवाड्यांवर नियंत्रण असते. अंगणवाडीला स्वतंत्र इमारत बांधून देण्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो. ज्या अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत आहे, त्या अंगणवाड्यांचीही अवस्था वाईट आहे. ज्या ठिकाणी अंगणवाडी सुरू करण्यासाठी काहीच सुविधा नाही, तिथे भाड्याने अंगणवाडी सुरू केली जाते. जिल्ह्यातील बहुतांश मिनी अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नाही.
- जिल्ह्यातील अंगणवाड्यांची स्थिती
एकूण अंगणवाड्या - २१६१
स्वतंत्र इमारत असलेल्या - १७५४
स्वतंत्र इमारत नसलेल्या - ४०७
शौचालय असलेल्या - १७८०
शौचालय नसलेल्या ८३१
- मिनी अंगणवाड्यांची स्थिती
मिनी अंगणवाडी - २६२
स्वतंत्र इमारत असलेल्या - ३२
इमारत नसलेल्या - २३०
शौचालय असलेल्या - ११२
शौचालय नसलेल्या - १५०
- अंगणवाड्यांची डागडुजी करण्यासोबतच नवीन अंगणवाड्यांचे बांधकाम आता डीपीसीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. डीपीसीकडून याकरिता आठ कोटीवरचा निधीही मंजूर झाला आहे. परंतु महिला व बाल कल्याण विभागाने डीपीसीकडे अतिरिक्त ६.२४ कोटीच्या निधीची मागणी केली आहे. त्यासंदर्भातील प्रस्तावही विभागाकडून तयारही करण्यात येत आहे. निधी मंजूर होताच अंगणवाड्यांचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे.
भागवत तांबे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास विभाग