नागपूर : तब्बल नऊ वर्षांनंतर होणाऱ्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) निवडणुकीत १८ पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी अखेरच्या दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत ७६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या उमेदवारांच्या अर्जाची छाननी सोमवारी होणार असून, वैध उमेदवारांची यादी मंगळवारी प्रकाशित होणार आहे.
अडतिये-व्यापारी मतदारसंघात दोन जागांसाठी सर्वाधिक २२ अर्ज ७६ उमेदवारांमध्ये सहा जणांनी डबल फॉर्म भरले आहेत. गुरुवारी एकाच उमेदवाराने चार फॉर्म भरले आहेत. लढतीत सर्वाधिक चुरस अडतिये-व्यापारी मतदारसंघात दिसून येत असून, दोन जागांसाठी २२ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. गुरुवारपर्यंत ३७ जणांचे फॉर्म आले, तर शुक्रवारी ३९ जणांनी अर्ज भरले आहेत. सेवा सहकारी संस्था मतदारसंघात ११ जागांसाठी ३१ जणांचे अर्ज आले आहेत. यात सर्वसाधारण गटात २२, महिला गटात ४, इतर मागासवर्गीय २, विमुक्त जाती- भटक्या जमाती संवर्गासाठी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात चार जागांसाठी १७ अर्ज आले आहेत. तर हमाल-मापारी गटात एका जागेसाठी सहा जणांनी अर्ज भरले आहेत. वैध उमेदवारांची यादी मंगळवारी प्रकाशित केल्यानंतर १२ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, १३ रोजी अंतिम यादी प्रकाशित होणार आहे. २३ ऑक्टोबरला मतदान होऊन २४ रोजी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे.
अखेरच्या दिवशी शुक्रवारी उमेदवार व समर्थकांची फारशी गर्दी नव्हती. काहींनी बॅन्डबाजासह उमेदवारी अर्ज दाखल केला. कमी अर्ज आल्यामुळे राजकीय पक्षांच्या पॅनेलनुसार निवडणूक होणार आहे. त्यात कुणाचे पारडे जड राहील, हे सांगणे कठीण आहे. पण नऊ वर्षांनंतर होणारी निवडणूक प्रमुख राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.