जिल्ह्यात ७,६८,६१४ कुटुंबीयांना मिळणार मोफत धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:07 AM2021-04-15T04:07:03+5:302021-04-15T04:07:03+5:30
नागपूर : राज्य सरकार वाढत्या कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी आजपासून राज्यात कडक लॉकडाऊन लावत आहे. लॉकडाऊनमुळे आस्थापना, उद्योग ...
नागपूर : राज्य सरकार वाढत्या कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी आजपासून राज्यात कडक लॉकडाऊन लावत आहे. लॉकडाऊनमुळे आस्थापना, उद्योग आणि कामे बंद राहणार असल्याने गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मोफत देणार आहे. या निर्णयाचा फायदा नागपूर जिल्ह्यातील ७६८६१४ शिधापत्रिका धारकांना होणार आहे.
राज्यात मार्च २०२० मध्ये केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन लावला होता. त्यावेळी स्वस्त धान्य दुकानदार अनेक कुटुंबीयांसाठी आधार ठरले होते. तेव्हाही अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सरकारने ५ किलो धान्य मोफत वाटले होते. आता परत राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. १५ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात गरिबांची आबाळ होऊ नये म्हणून सरकारने आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी वेगवेगळे पॅकेज जाहीर केले आहे. त्यातच शिधापत्रिका धारकांना सुद्धा ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रेशन दुकानातून एप्रिल महिन्याच्या धान्याचे वाटप सुरू आहे. मे महिन्याचा धान्यसाठा सुद्धा लवकरच मिळणार आहे. त्याचबरोबर ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांच्या पोटापाण्याची १५ दिवसांची सोय सरकारने केली आहे.
नागपूर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण मिळून १३०० स्वस्त धान्य दुकानदार आहेत. यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारकांना रेशन मिळते. केशरी कार्डधारकांना नियमित रेशनचा लाभ मिळत नाही. परंतु गेल्या लॉकडाऊनमध्ये केशरी कार्डधारकांनाही ५ किलो मोफत धान्य सरकारने दिले होते. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयात केशरी कार्डबाबत स्पष्ट निर्देश नाहीत.
- शिधापत्रिकाधारक
ग्रामीण
अंत्योदय - ७७०७८
प्राधान्य - ३१५०८२
शहर
अंत्योदय - ४४६८८
प्राधान्य - ३३१७६६
- मोफत मिळणारे धान्य
३ किलो गहू व २ किलो तांदूळ
- मागच्यावर्षी सरकारने लॉकडाऊननंतर खरोखरच आम्हाला रेशनचा आधार दिला. आता पुन्हा सरकारने लॉकडाऊनच्या काळात नियमित धान्याबरोबर ५ किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेऊन शिधापत्रिका धारकांना दिलासा दिला आहे.
- अलका रामटेके, शिधापत्रिकाधारक
- रेशनच्या दुकानातून नियमित मिळणारे धान्य पुरे होते. या मोफत धान्याऐवजी खाद्यतेल दिले असते, तर गरिबांना त्याचा जास्त फायदा झाला असता. आज खाद्यतेलाच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत.
- तेजराम जनबंधू, शिधापत्रिकाधारक
- रेशन वितरण करण्याची आमची जबाबदारीच आहे. पण सरकारने आमच्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मोठ्या संख्येने रेशन दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. आमची सरकारला मागणी आहे की, धान्याचे वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्याची परवानगी द्यावी आणि रेशनकार्ड धारकांना विमा सुरक्षा प्रदान करावी.
- गुड्डू अग्रवाल, अध्यक्ष, राशन दुकानदार संघ