नागपुरातील ३ हजार ले-आऊटच्या विकासासाठी हवेत ८०० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 01:24 AM2019-01-03T01:24:32+5:302019-01-03T01:24:51+5:30
नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र) च्या कार्यक्षेत्रात येणारे जवळपास तीन हजार अभिन्यास (ले-आऊ ट) महापालिकेला हस्तांतरित होणे अपेक्षित आहेत. या अभिन्यासात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. येथील विकास कामांसाठी ७०० ते ८०० कोटींची गरज आहे. मात्र नासुप्रने यासाठी ९३ कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. अशा परिस्थितीत या अभिन्यासाचा विकास कुणी करावा या वादात अभिन्यासाचे हस्तांतरण अडकले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र) च्या कार्यक्षेत्रात येणारे जवळपास तीन हजार अभिन्यास (ले-आऊ ट) महापालिकेला हस्तांतरित होणे अपेक्षित आहेत. या अभिन्यासात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. येथील विकास कामांसाठी ७०० ते ८०० कोटींची गरज आहे. मात्र नासुप्रने यासाठी ९३ कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. अशा परिस्थितीत या अभिन्यासाचा विकास कुणी करावा या वादात अभिन्यासाचे हस्तांतरण अडकले आहे.
राज्य सरकारने दीड वर्षापूर्वी नासुप्र बरखास्त करण्याला तत्त्वत मंजुरी दिली होती. डिसेंबर २०१७ यासाठी डेडलाईन निश्चित करण्यात आली होती. परंतु नासुप्र बरखास्त व अभिन्यास हस्तांतरण करून चालणार नाही. अभिन्यासातील विकास कामांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. विकास न करताच अभिन्यास महापालिकेला हस्तांतरित केले तर याचा आर्थिक बोजा महापालिकेवर पडणार आहे. यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता सध्या निधी खर्च करण्याजोगी परिस्थिती नाही.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नासुप्रचे अभिन्यास महापालिकेला तातडीने हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहे. परंतु आर्थिक स्थिती विचारात घेता महापालिक यासाठी राजी नसल्याचे चित्र आहे. अभिन्यास महापालिकेला हस्तांतरित करण्यात आले तरी या भागातील विकास कामांसाठी अनेक वर्ष लागणार असल्याची शंका जाणकारांनी व्यक्त केली आहे. सध्या अभिन्यास नासुप्रच्या कार्यक्षेत्रात असल्याने त्यांना येथे पाणीपुरवठा, रस्ते, गडर लाईन अशा मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्या लागत आहेत. अनधिकृत अभिन्यास विकासित करण्याच्या नावाखाली नासुप्रने नागरिकांकडून मोठा निधी जमा केला आहे. परंतु नागरिक सुविधापासून वंचित आहेत.
किमान ५०० कोटींची गरज
नासुप्रच्या अधिकार क्षेत्रात जवळपास तीन हजार अभिन्यास आहेत. यातील अर्ध्याहून अधिक अभिन्यासांचा विकास झालेला नाही. अभिन्यास हस्तांतरित करून घेण्याला महापालिकेने सहमती दर्शविल्यास या भागातील विकास कामांसाठी किमान ५०० कोटींचा निधी लागणार आहे. परंतु नासुप्रची जेमतेम ९३ कोटी शिल्लक असल्याचे सांगत आहे. त्यामुळे अभिन्यास हस्तांतरण सोपे नसल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष व नासुप्रचे विश्वस्त वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.