८०० कि.मी. अंतराची ‘टायगर लँड’ अॅडव्हेन्चर रॅली
By admin | Published: January 4, 2015 12:58 AM2015-01-04T00:58:36+5:302015-01-04T00:58:36+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त विदर्भ आॅटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशनच्या वतीने(वारा) ८०० किलोमीटर अंतराची टायगर लँड अॅडव्हेंचर रॅलीचे आयोजन २४ जानेवारी रोजी करण्यात येत आहे.
वाराचे आयोजन : दुचाकी, चारचाकी वाहनांचा सहभाग
नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त विदर्भ आॅटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशनच्या वतीने(वारा) ८०० किलोमीटर अंतराची टायगर लँड अॅडव्हेंचर रॅलीचे आयोजन २४ जानेवारी रोजी करण्यात येत आहे.
मोटरसायकल आणि चारचाकी वाहनांसाठी असलेल्या या रॅलीत केवळ ३० स्पर्धकांना प्रवेश राहील. विविध गटातील विजेत्याना एकूण दोन लाख रुपयांची रोख पारितोषिके आणि ट्रॉफी देण्यात येतील, अशी माहिती वाराचे अध्यक्ष मेहरनोश मवालवाला यांनी पत्रपरिषदेत दिली.
मनपाच्या नागपूर महोत्सवाचा भाग असलेल्या या रॅलीत सहभागी स्पर्धकांशिवाय अॅडव्हेंचर सफारीचा आनंद घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांनादेखील रॅलीच्या मार्गाने वाहन चालविण्याचा अनुभव घेता येईल. वोक्सवॅगनने ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे. तीन दिवसांच्या या रॅलीची दोन भागात विभागणी करण्यात आली आहे.
२४ जानेवारी रोजी सकाळी देशपांडे सभागृहाबाहेर रॅलीचा प्रारंभ झाल्यानंतर बोर टायगर पार्क, कुरई पार्क सातपुडा पर्वतरांगा असा ५०० कि.मी.चा प्रवास पूर्ण करेल. दोन रात्री स्पर्धकांना विश्रांती घेता येईल. रॅलीचा समारोप कान्हा राष्ट्रीय पार्कमध्ये २५ ला होईल. पुरस्कार वितरण कान्हा येथेच २६ ला सकाळी केले जाणार आहे. स्पर्धेत १८ स्पर्धकांनी प्रवेश निश्चित केले आहेत. उर्वरित १२ स्पर्धकांसाठी ‘प्रथम या प्रथम मिळवा’ या तत्त्वावर १० जानेवारीपर्यंत प्रवेश दिले जातील. मोटर स्पोर्टस् फेडरेशनच्या वार्षिक वेळापत्रकात या रॅलीचा समावेश असल्याचे मवालवाला यांनी सांगितले.
स्पर्धकांची काळजी घेण्यासाठी नियमानुसार चोख वैद्यकीय व्यवस्था करण्यात येईल, असे ते म्हणाले. पत्रपरिषदेला वाराचे चेअरमन शब्बीर वली, छत्तीसगड पर्यटन विभागाच्या अधिकारी पल्लवी शिंपले, रॅली आयोजन समितीचे चेअरमन निशिकांत जाधव, वाराच्या मोहीम समितीचे चेअरमन संदीप देशमुख आदींची उपस्थिती होती. (क्रीडा प्रतिनिधी)