भूजलवाढीसाठी राज्यात ९२५ कोटींचा प्रकल्प राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 07:00 AM2020-12-01T07:00:00+5:302020-12-01T07:00:03+5:30
Water Nagpur News राज्यातील भूजल पातळीमध्ये वाढ व्हावी म्हणून केंद्र सरकारकडून राज्यात राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन सुधार प्रकल्प राबविला जाणार आहे.
गोपालकृष्ण मांडवकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील भूजल पातळीमध्ये वाढ व्हावी म्हणून केंद्र सरकारकडून राज्यात राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन सुधार प्रकल्प राबविला जाणार आहे. या अंतर्गत राज्यातील १३ जिल्ह्यांमधील १,४४३ गावांची निवड करण्यात आली असून यात विदर्भातील नागपूर, अमरावती आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने या प्रकल्पाची घोषणा २०१९ मध्ये केली होती. त्यावर अध्ययन करून ती आता अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांच्या काळामध्ये ही योजना राबविली जाणार असून यासाठी ९२५ कोटी ७७ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. ही योजना राबविताना अतिशोषित, शोषित, अंशत: शोषित पाणलोट क्षेत्रांना प्राधान्य दिले जाणार आहे. राज्याच्या २०१३ मधील भूजल अहवालानुसार अतिशोषित ७४, शोषित ४, अंशत: शोषित असलेली १११ पाणलोट क्षेत्रे आहेत. या सर्व ठिकाणी आगामी पाच वर्षांच्या काळात ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी लोकसहभातून जलसुरक्षा आराखडे तयार केले जाणार आहेत.
या जिल्ह्यात राबविणार योजना
राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जाणार असून यात नागपूर, अमरावती, बुलडाणा या विदर्भातील तीन जिल्ह्यांसह जालना, उस्मानाबाद, लातूर, पुणे, सातारा , सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव यांचा समावेश आहे. राज्यातील एकूण १८९ पाणलोट क्षेत्रांपैकी १३ जिल्ह्यांतील ३८ तालुक्यांमधील ७३ पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या १,३३९ ग्रामपंचायतींमधील १,४४३ गावांची निवड यात करण्यात आली आहे.
अंमलबजावणीसाठी समित्या
योजनेच्या अंमलबजावणीसाठी तीन राज्यस्तरीय समित्या, तीन जिल्हास्तरीय समित्यांचे गठण केले जाणार आहे. यातून योजनेवर नियंत्रण राखले जाईल.
भूजलसंबंधी माहिती व अहवाल सर्वसामान्य नागरिकांना कळावा यासाठी संकेतस्थळ तयार केले जाईल. यासाठी ७३ कोटींची तरतूद आहे. कार्यक्षम पाणी वापर पद्धतीचा अवलंब करण्यासाठी २९५ कोटींची तरतूद आहे तर, भूजल पातळीच्या दरात सुधारणा करण्यासाठी ११० कोटी रुपयांची तरतूद यात आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये
- सूक्ष्म सिंचनाचा अधिकाधिक वापर
- मातीमधील आर्द्रता टिकवून ठेवणाऱ्या प्रणालीचा वापर
- पाणी उपलब्धतेनुसार पीक संरचना आदी उपाययोजना प्रस्तावित
- सर्व उपाययोजना व कामे पूर्ण झाल्यावर त्रयस्थ एजन्सीकडून निरीक्षण विहिरीतील भूजल पातळीचा अभ्यास
- भूजल पातळीच्या दरात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना
येथे राबविणार योजना
जिल्हा तालुके पाणलोट क्षेत्र ग्रामपंचायती गावे
नागपूर २ २ ७६ १२३
अमरावती ३ ६ २१७ २१७
बुलडाणा १ ४ ६८ ६८
पुणे ३ ५ ११० ११८
सातारा ३ ३ ११४ ११४
सोलापूर ४ ५ ११५ ११७
नाशिक २ ९ १ १६ १२९
अहमदनगर ३ ६ १०१ १०९
जळगाव ४ ६ १०१ ११४
जालना ३ ५ ५० ५०
लातूर ४ ९ १२१ १३६
उस्मानाबाद २ ७ ५ ५ ५ ५
...