ओव्हरटेक करताना कार बसवर धडकली; एकाचा मृत्यू, सहा जखमी
By सुनील चरपे | Published: November 5, 2022 04:11 PM2022-11-05T16:11:08+5:302022-11-05T16:13:28+5:30
धडक लागताच बस व कार रोडच्या खाली उतरली. यात अनिकेतचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर बस व कारमधील प्रत्येकी तिघे, असे सहा जण जखमी झाले.
केळवद : समोर असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेली कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसवर धडकली. त्यामुळे बस रोडच्या खाली उतरली. या अपघातात कारचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले. यात बस व कारमधील प्रत्येकी तिघांचा समावेश आहे. ही घटना केळवद (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर- केळवद मार्गावरील परसोडी शिवारात शनिवारी (दि.५) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
अभिकेत प्रभाकर लिचडे (२५, रा. राजीवनगर, सोमलवाडा, नागपूर), असे मृत कारचालकाचे नाव असून, जखमींमध्ये कारमधील निर्भय मेघराज चन्ने (२५), पीयूष विजय बांगडे (२५) व शुभम राजू ठाकरे (२५), तिघेही रा. सोमलवाडा, नागपूर यांच्यासह बसधील वासुदेव नत्थू श्रीरामे (७६, रा. भोलेनगर, हुडकेश्वर, नागपूर), सीताराम जयराम रेपाटे (७६, रा. हुडकेश्वर, नागपूर व दीपा चैतराम चौरे (३७, रा. वॉर्ड क्रमांक-१, केळवद, ता. सावनेर) या तिघांचा समावेश आहे. त्या सहाही जणांना उपचारार्थ नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
अनिकेत व त्याच्या तीन मित्रांनी शनिवारी सकाळी जामसावळी, ता. सौसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश येथे बजरंगबलीचे दर्शन घेऊन पूजा-आरती केली आणि एमएच-४०/सीएच-०११८ क्रमांकाच्या कारने ते केळवद, सावनेरमार्गे नागपूरला जायला निघाले. केळवद- सावनेरदरम्यानच्या परसोडी (ता. सावनेर) शिवारात येताच अनिकेतने कारसमोर असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी विरुद्ध दिशेने म्हणजे सावनेरहून केळवद येथे जाणारी एमएच-४०/एच-९९९२ क्रमांकाची बस जवळ येताच अनिकेतचा कारवरील ताबा सुटला आणि ती कार बसवर धडकली.
धडक लागताच बस व कार रोडच्या खाली उतरली. यात अनिकेतचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर बस व कारमधील प्रत्येकी तिघे, असे सहा जण जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अनिकेतचा मृतदेह व जखमींना सावनेरात पाठविले. जखमींवर सावनेरातील शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती केले. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी पीयूष बांगडे यांच्या तक्रारीवरून बसचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) गुन्हा दाखल केला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक कामटे करीत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जीवावर उठले
सावनेर- केळवद- सौसर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडून टोल वसूल केला जातो. पाच वर्षांपासून या रोडची दैन्यावस्था झाली आहे. दुरुस्तीअभावी रोडवरील खड्ड्यांचा आकार व खोली वाढत आहे. या रोडच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नागरिकांच्या जीवावर उठले आहे.
अर्धी बाजू बरी, अर्धी खराब
या रोडची एक बाजू बरी असून, दुसरी खराब आहे. खराब बाजूवरून वाहन चालविताना त्रास होत असल्याने चालक त्याचे वाहने दुसऱ्या बाजूने घेतात. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला विरुद्ध दिशेने अचानक वेगात वाहन आल्यास अपघात होतात. हा रोड आता समतल राहिला नाही. चालकाने बस आधी थांबविली असती, तर हा अपघात टळला असता.