Video : मांजात वटवाघूळ अडकला, वाचविण्यासाठी आणली क्रेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 05:13 PM2022-01-19T17:13:24+5:302022-01-19T18:01:21+5:30
मकरसंक्रांतीमध्ये झालेल्या पतंगबाजीनंतर झाडआणि विजेच्या खांबांवर अडकलेला मांजा पक्षी आणि प्राण्यांसाठी धाेकादायक असताे. वनविभागाने झाडांवरील मांजा काढण्यासाठी अभियान सुरू केले आहे.
नागपूर : जीव माणसाचा असो किंवा पक्ष्याचा, असतो अनमोलच ! अशाच एका वटवाघळासारख्या जीवाला वन विभागाच्या पथकाने मांज्यातून सोडवून जीवदान दिले. जवळपास ६० फूट उंच असलेल्या शेमलच्या झाडावर अडकलेल्या वटवाघळासाठी चक्क क्रेन बोलावली, आणि जीव वाचविला.
एक वटवाघुळ मांजात अडकून तडफडत असल्याची माहिती वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला मिळाली. पथकाने तेथे जाऊन वटवाघळाला काढण्यासाठी झाडावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य नव्हते. अखेर महापालिकेकडून क्रेन बोलावण्यात आली. त्या क्रेनवर चढून ट्रान्झिटचा जवान आशिष महल्ले यांनी तडफडणाऱ्या वटवाघळाला मांजामुक्त केले.
मांज्यामुक्त झाडाची संकल्पना
मकरसंक्रांतीमध्ये झालेल्या पतंगबाजीनंतर झाडआणि विजेच्या खांबांवर अडकलेला मांजा पक्षी आणि प्राण्यांसाठी धाेकादायक असताे. वनविभागाने झाडांवरील मांजा काढण्यासाठी अभियान सुरू केले आहे. वनविभागाच्या या माेहिमेत पाेलीस विभाग, महापालिका आणि अनेक स्वयंसेवी संस्थांचे सदस्य मदतीला धावत आहेत.
नागपुरातील झाडावर अडकलेला मांजा काढायला हवा, ही भावना जागवत सारे विभाग व स्वयंसेवी संस्था ‘मांजामुक्त झाड’ ही संकल्पना समोर ठेऊन अभियान चालवित आहेत. या अभियानात पक्षिप्रेमी अविनाश लोंढे, विनीत अरोरा, उधमसिंग यादव, अजिंक्य भटकर, सौरभ सुखदेवे, मोनू सिंग, शिरीष नाखले, वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे, विजय गंगावणे, सारिका आदमणे यांचा सहभाग आहे.