नागपूर : हुडकेश्वर पिपळा फाटा परिसरात एक माेठे हिरव्या रंगाचे कासव रस्त्यावर सापडले. तर फेटरी गावातील एका घरात विषारी नाग आढळून आला. वन्यजीव रक्षक पथकाने या दोन्ही ठिकाणी धाव घेत हिरव्या रंगाचे कासव व विषारी नागाला जीवनदान दिले.
हुडकेश्वर पिपळा फाटा क्षेत्र परिसरात असलेल्या नाल्यातून सकाळच्या सुमारास एक मोठे हिरव्या रंगाचे कासव रस्त्यावर आले. लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली. कासवाला पकडण्याचा प्रयत्न सुरू झाला, या गर्दीतील आकाश गुप्ता नावाच्या युवकाने कासवाला आपल्या ताब्यात घेतले व लगेच बाळासाहेब ठाकरे प्राणी उद्यान वन्यजीव रेस्क्यू पथक गोरेवाडाला संपर्क साधला. सूचना मिळताच वन्यजीव रक्षक पथक घटनास्थळी दाखल झाले. कासवाची ही जात भारतीय फ्लॅप शेल कासव (इंडियन फ्लॅप शेल टर्टल) असून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत या कासवाला कायद्याने संरक्षण प्राप्त आहे तसेच शेड्यूल १ मध्ये याचा समावेश आहे. त्याचे वजन अंदाजे २ किलो असल्याचे निर्दशनास आले.
त्याचप्रकारे ग्रामीण क्षेत्रातील गावात साप निघण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. शुक्रवारी माहुरझरी गावातील बिछायत केंद्रात जहाल विषारी परड (रसेल वायपर) जातीचा साप शिरला होता. तर शनिवारी सकाळी फेटरी गावात ५ फूट लांबीचा विषारी नाग घरातील आलमारीच्या खाली लपून बसला होता. यामुळे लोकांची तारांबळ उडाली होती. माहिती मिळताच गोरेवाडा वन्यजीव रक्षक पथकाने घटनास्थळी दाखल होऊन सांपाना सुरक्षितरीत्या रेस्क्यू करून त्वरित निसर्गाच्या सान्निध्यात सोडले.
ही कारवाई गोरेवाडा प्रकल्पाचे व्यवस्थापक शतानीक भागवत यांच्या मार्गदर्शनात सारिका खोत, दीपक सावंत, प्रतीक घाटे, शुभम चापेकर, स्वप्निल बोधाने, आशिष कोहळे, शुभम पडोळे, अविनाश शेंडे, बंटी गोडबोले, चक्रधर कोल्हे, पवन सोमकुंवर, इस्लामुद्दीन काझी, सुमित गोडबोले यांनी केली.